लायसन्स, ‘आरसी’ घरी विसरलात; डिजिलॉकर दाखवा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 11:52 IST2025-01-25T11:52:21+5:302025-01-25T11:52:30+5:30
Digilocker: वाहनांच्या कागदपत्र पडताळणीदरम्यान लायसन्स किंवा वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) घरी विसरलात, तर ‘डिजिलॉकर’ ॲपमधील त्याच्या सॉफ्ट कॉपीचा वापर तुम्ही करू शकता.

लायसन्स, ‘आरसी’ घरी विसरलात; डिजिलॉकर दाखवा?
मुंबई - वाहनांच्या कागदपत्र पडताळणीदरम्यान लायसन्स किंवा वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) घरी विसरलात, तर ‘डिजिलॉकर’ ॲपमधील त्याच्या सॉफ्ट कॉपीचा वापर तुम्ही करू शकता. देशभर ‘डिजिलॉकर’मधील कागदपत्रांना मान्यता असल्याने वाहतूक पोलिसही तुम्हाला योग्य सहकार्य करतील, असे पोलिसांनी सांगितले.
दंड, वाहनही होईल जप्त...
वाहन चालवताना तुम्ही लायसन्सची भौतिक किंवा इलेक्ट्रॉनिक प्रत सादर करू न शकल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. तसेच तुमच्याकडे जर परवानाच नसेल तर तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो. तसेच अधिकारी तुमचे वाहनही जप्त करू शकतात.
कागदपत्रे नाकारल्यास तक्रार दाखल करा
पोलिस कर्मचाऱ्याने ‘डिजिलॉकर’मधील कागदपत्रे नाकारल्यास त्याच्या वरिष्ठांशी बोला. त्यांनी न ऐकल्यास पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करा.
‘डिजिलॉकर’मध्ये हे स्टोअर करा
वाहन चालविण्याचा परवाना
वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी)
विमा प्रमाणपत्र
फिटनेस प्रमाणपत्र
उत्सर्जन चाचणी प्रमाणपत्र
वाहतूक पोलिसांना कागदपत्रे मान्य झाली ना?
माहिती तंत्रज्ञान कायदा २००९ हा ‘डिजिलॉकर’वरील इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मूळ कागदपत्रांच्या समतूल्य मानतो. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयही त्याला परवानगी देते. त्यामुळे वाहतूक पोलिसही ही कागदपत्रे नाकारू शकत नाहीत, असे पोलिसांनी सांगितले.
वाहन चालकांनो, असा घ्या या सुविधेचा लाभ
डिजिलॉकर ॲप डाउनलोड करा आणि नोंदणी करत रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्रालयाच्या होमपेजवरून ड्रायव्हिंग लायसन्स निवडा.
तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाका आणि ॲप तुमच्या परवान्याची पीडीएफ कॉपी तयार करेल. ती कॉपी वाहतूक पोलिस अधिकाऱ्याला दाखवा.
अधिकृत ॲपचा वापर करा
डिजिटल दस्तऐवजांचा वापर केल्याने मूळ कागदपत्रे सुरक्षित राहतात. त्यामुळे बनावट कागदपत्रांपासूनही बचाव होतो. ‘डिजिलॉकर’ आणि ‘एम परिवहन’ अशा अधिकृत ॲपमधून कागदपत्रांचे डिजिटल स्वरूप कायदेशीर मानले जाते.