Join us  

लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 6:44 PM

वीज मंडळाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन पुकारण्यात आले होते.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात व्यवसाय ठप्प पडले आहेत. नागरिक घरात असल्याने सर्वांची रोजी रोटी बंद आहे. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाउन काळातील वीज बिल माफ करावे यासाठी भांडुप पश्चिम, वीज मंडळाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन पुकारण्यात आले होते. राज्य सरकारने तात्काळ वीज बिले माफ करावी. अन्यथा राज्यभर विजबिले न भरण्याची मोहीम हाती घेवून सरकारशी असहकार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. 

लॉकडाउनमुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशातच विज कंपन्यांकडून नागरीकांना अव्वाच्यासव्वा बिले आली आहेत. त्यामुळे ज्यांचे हातावर पोट आहे, ज्यांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत, अशांना ही बिले भरणे कठीण झाली आहेत. वीज कंपन्यांनी वीज बिले भरण्यासाठी तगादा लावल्याने आत्महत्या झाल्याचे घटनाही घडत आहेत. त्यामुळे सरकारने ३०० युनिट पर्यंतच्या ग्राहकांची विजबिले तात्काळ माफ करावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे, अशी माहिती प्रभाकर नारकर यांनी दिली. 

दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर असणा-या राज्यातील सर्व गरीब व सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांची गेल्या ३ महिन्यांची वीज देयके माफ करण्यात यावीत. या ग्राहकांच्या रकमेची भरपाई राज्य सरकारने करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना यांनी धरणे आंदोलन जाहीर केले  होते. संपूर्ण राज्यात सर्व जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांनी आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याच वेळी धरणे आंदोलन करावे, असे आवाहन वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी केले होते.

प्रथम १३ जुलै रोजी या मागणीसाठी राज्यस्तरीय वीज बिल होळी आंदोलन जाहीर करण्यात आले होते. हे आंदोलन राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये, कांही ठिकाणी अनेक तालुक्यांमध्ये, अनेक गावांमध्ये व मुंबईसह अनेक महापालिका क्षेत्रात झाले. या आंदोलनानंतर राज्य सरकारने घरगुती वीज ग्राहकांना वीज बिलांमध्ये २० ते ३० टक्के सवलत देण्यात येईल, असे जाहीर केले आहे. तथापि ही तोकडी सवलत वीज ग्राहकांना मान्य व दिलासा देणारी नाही.  

टॅग्स :महावितरणमहाराष्ट्रकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस