चांदिवलीत बहरतेय जंगल, ४१ हजार वृक्षांची लागवड; मुंबई महापालिकेचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 08:59 IST2025-04-24T08:59:15+5:302025-04-24T08:59:31+5:30

वसुंधरा दिनानिमित्त मुंबईत शाश्वत शहरी वनस्पती संवर्धन व पर्यावरण संरक्षणावर आधारित कार्यक्रम पालिकेने बुधवारी आयोजित केला होता

Forest is flourishing in Chandivali, 41 thousand trees planted; Mumbai Municipal Corporation's initiative | चांदिवलीत बहरतेय जंगल, ४१ हजार वृक्षांची लागवड; मुंबई महापालिकेचा उपक्रम

चांदिवलीत बहरतेय जंगल, ४१ हजार वृक्षांची लागवड; मुंबई महापालिकेचा उपक्रम

मुंबई : शहर आणि उपनगरातील प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई महापालिका विविध उपाययोजना राबवीत आहे. त्याचबरोबर आता वृक्षसंपदा वाढविण्यावर भर दिला जात आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून चांदिवली येथे  ४१ हजार २०७ झाडे लावण्यात आली असून, एकप्रकारे ‘शहरी जंगल’ विकसित करण्यात आले आहे.

वसुंधरा दिनानिमित्त मुंबईत शाश्वत शहरी वनस्पती संवर्धन व पर्यावरण संरक्षणावर आधारित कार्यक्रम पालिकेने बुधवारी आयोजित केला होता. या कार्यक्रमात नामांकित कॉर्पोरेट उद्यानतज्ज्ञ,  अर्बोरिस्ट आणि पालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. हा उपक्रम चांदिवली येथील ‘नाहर अमृत शक्ति गार्डन’ येथे पार पडला. तेथे मियावाकी पद्धतीने एक आदर्श शहरी जंगल विकसित करण्यात आले आहे. 

या शहरी जंगलाचा विस्तार १६ हजार चौरस मीटर असून, तेथे ४१ हजार २०७ झाडे लावण्यात आली आहेत. त्यात जांभूळ, अर्जुन, पळस, मोह, आंबा, पिंपळ यांसारख्या एकूण ७९ देशी प्रजातींचा समावेश आहे. वायू गुणवत्ता सुधारणे, उष्णता कमी करणे आणि ध्वनी प्रदूषण कमी करणे हा मियावाकी पद्धतीच्या वृक्षारोपणाचा मुख्य उद्देश आहे. या पद्धतीने तयार झालेले जंगल शहरी हिरवाई संवर्धनाचे एक आदर्श उदाहरण ठरले आहे.

वनसंवर्धन, अर्बोरिकल्चर 
उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी मियावाकी जंगल यशस्वी होण्यामागील बारकावे सांगितले. शहराच्या पर्यावरण आरोग्य सुधारण्यात शहरी वनसंवर्धन व अर्बोरिकल्चरचे महत्त्व सांगितले. मुंबईतील हिरवळीच्या संवर्धनासाठी तज्ज्ञांनी विविध उपाय सुचविले आणि लहान प्रकल्पांमधूनही शाश्वत बदल घडवून आणता येतो, हे अधोरेखित केले. 

नाहर अरण्याचे दर्शन
या कार्यक्रमादरम्यान मियावाकी जंगलातील फेरी आयोजित करण्यात आली होती. त्यात मियावाकी पद्धतीने विकसित केलेल्या नाहर अरण्याचे दर्शन घडविण्यात आले. त्यातून मिळालेल्या परिणामकारक फळांबाबत माहिती देण्यात आली.

पर्यावरणीय आरोग्यात मोठी सुधारणा
मियावाकी पद्धतीने केलेल्या वृक्षारोपणामुळे शहरी प्रदूषणात लक्षणीय घट झाली आहे. तसेच पर्यावरणीय आरोग्यात मोठी सुधारणा झाली आहे. 
हे यश हवामान अनुकूलता वाढविण्यास आणि पर्यावरणीय समृद्धी साधण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, असा दावा पालिकेने केला आहे. 

Web Title: Forest is flourishing in Chandivali, 41 thousand trees planted; Mumbai Municipal Corporation's initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.