परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 05:45 IST2025-10-20T05:45:59+5:302025-10-20T05:45:59+5:30
शक्ती, भक्ती आणि ज्ञानही आहे. त्याद्वारे कर्म करायचे आहे. ते आपले कर्तव्य आहे, असे डॉ. भागवत म्हणाले.

परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सुरुवातीला आलेल्या परकीयांनी विध्वंस केला. आपल्याला लुटले. शेवटी आलेल्यांनी आपल्या बुद्धीला लुटले. त्यातून आपली संस्कृती समृद्ध असल्याचे आपण विसरून गेलो होतो. मात्र, आपले सौभाग्य आहे की, आपल्याकडील आध्यात्मिक परंपरा अखंड चालत आली आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
डॉ. भागवत म्हणाले, लोकांनी इकडे येऊन आपल्याला पराभूत केले, ते विजेते झाले. आपण जगात सद्भावना घेऊन गेलो. मात्र, हे बाहेरून आलेले लोक ‘बुभुक्षित’ होते. त्यांना सर्व गोष्टी हव्या होत्या. स्पर्धेत त्यांना पुढे जायचे होते. आपल्याकडे शास्त्र आहे, शस्त्र पण आहे, तसेच शक्ती, भक्ती आणि ज्ञानही आहे. त्याद्वारे कर्म करायचे आहे. ते आपले कर्तव्य आहे, असेही डॉ. भागवत म्हणाले.
आपल्याला पूर्वजांच्या ज्ञानाकडे जावे लागेल. त्यासाठी भारतीय ज्ञान परंपरा आणली आहे. त्यातून गणित, भूमिती आणि विविध शास्त्रांची माहिती दिली जात आहे. आपल्या पूर्वजांनी हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी विशेष दृष्टीचा उपयोग केला. त्यातून एक सत्य कळाले. त्यातून मूल्याधारित धर्म आणि संस्कृती तयार झाली. त्यातून शक्ती, ज्ञान मिळाले. आपण भक्ती करू शकलो आणि कर्म करत राहिलो. त्यामुळे आता त्या दृष्टीकडे परत जाऊन पुन्हा चिंतन करावे लागेल, असेही डॉ. भागवत यांनी सांगितले. यावेळी गीतार्थ गंगा आणि नालंदा विद्यापीठ यांच्यात ‘इंडिक स्टडीज’बाबत करार करण्यात आला.
गुलामीची मानसिकता सोडावी लागेल : युरोपीय शक्तींनी भारतीय मानवतेच्या प्रत्येक भागाचे वसाहतीकरण केले. देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटली असली, तरी मानसिक गुलामी तशीच आहे. या गुलामीची मानसिकता सोडावी लागेल. ही संधी आहे, असे आचार्य युगभूषण सुरीजी महाराज साहेब यांनी सांगितले.