Join us

जवानासाठी परदेश दौरा रद्द! सगळी रक्कम शहीद मुरली नाईक यांच्या कुटुंबीयांना देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 12:01 IST

काही दिवसापूर्वी भारत-पाकिस्तान तणावा दरम्यान, शहीद झालेले जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबाला मुंबईतील एका दाम्पत्याने आर्थिक मदत केली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाला होता. भारताने या हल्ल्याचा बदला 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत घेतला. पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले. यानंतर सीमेवर संघर्ष निर्माण झाला, यात जवान मुरली नाईक शहीद झाले.

नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या गोळीबारात आपल्या देशातील अनेक सैनिक शहीद झाले आहेत. त्या सैनिकांपैकी एकाचे नाव मुरली नायक आहे. आंध्र प्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यातील कल्लीथंडा गावात राहणारा मुरली हा त्याच्या पालकांचा एकुलता एक मुलगा होता.

Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...

दरम्यान, मुंबईतील एका जोडप्याने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्वांकडून स्वागत होत आहे. या जोडप्याने त्यांच्या परदेश दौऱ्यासाठी वाचवलेले १ लाख रुपये मुरली यांच्या कुटुंबाला देऊन एक आदर्श घालून दिला आहे. ही माहिती इंस्टाग्रामवरील 'VRyuva' नावाच्या पेजने दिली आहे.

शहीदांच्या सन्मानार्थ घेतला निर्णय

सीमेरवर शहीद झालेले सैनिक मुरली नाईक यांच्या सन्मानार्थ या जोडप्याने हा निर्णय घेतला. या जोडप्याने त्यांची ओळख गुप्त ठेवली आहे. इंटरनेटवर लोक त्यांच्या या कृतीचे कौतुक करत आहेत.

शहिद मुरली नाईक यांचे बालपण मुंबईतील कामराज नगरमध्ये गेले. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशात झाला. त्यांचे  आई वडील कामासाठी मुंबईत आले होते. एका पुनर्विकास प्रकल्पात घर गेल्यानंतर कुटुंबीय पुन्हा आंध्र प्रदेशात परतले. मुरली नाईक शहीद झाल्यानंतर त्यांनी दुःख व्यक्त करत आम्ही आता अनाथ झालो अशी प्रतिक्रिया दिली. 

आंध्र प्रदेश सरकारने मदत जाहीर केली

आंध्र प्रदेश सरकारने शहीद मुरली नाईक यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. याशिवाय, त्यांना ५ एकर जमीन, ३०० चौरस यार्डचे घर आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचे जाहीर देण्यात आले आहे. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनीही मुरली नाईक यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले. 

टॅग्स :भारतीय जवानमुंबईऑपरेशन सिंदूर