Foreign investment of four lakh crores in the state - Mungantiwar | राज्यात चार लाख कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक- मुनगंटीवार
राज्यात चार लाख कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक- मुनगंटीवार

मुंबई : थेट विदेशी गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हे सर्वाधिक पसंतीचे राज्य राहिले असून गेल्या चार वर्षात राज्यात ३ लाख ९९ हजार ९०१ कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक झाली, अशी माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ५०२८ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेतून ४,७६३.७ लाख घनमीटर जलसाठ्याची निर्मिती झाली असून ४२९८ गावे पाणी टंचाईमुक्त करण्यात आली, असा दावाही त्यांनी केला.

२०१८-१९ चा आर्थिक पाहणी अहवाल सोमवारी विधानसभेत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर परिषदेत राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सादर केला. देशांतर्गत स्थुल राष्ट्रीय उत्पन्नात राज्याचा हिस्सा सर्वाधिक राखण्यात महाराष्ट्राला यश मिळाले असून ही टक्केवारी १५ टक्के इतकी आह. सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नात गेल्या पाच वर्षात भरीव वाढ झाली आहे.

ठळक वैशिष्ट्ये
२.७८ कोटी शिधापत्रिकांपैकी २.४२ कोटी शिधापत्रिकांचे संगणकीकरण
१.२९ कोटी कुटुंबांनी आधार आधारित बायोमॅट्रीक प्रमाणीकरणासह शिधापत्रिकेचा वापर केला.
राज्य महसुली जमेत वाढ. २,४३,६५४ कोटीची महसूली जमा २०१८-१९ च्या
सुधारित अंदाजाप्रमाणे २,८६,५०० कोटी रुपये
मुद्रा योजनेत कर्ज वितरित करण्यात महाराष्ट्र अग्रेसर. ६५ हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरित.
राज्यात या पावसाळ्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प.
तेलबिया, कापूस आणि उसाच्या उत्पादनात अनुक्रमे १६ टक्के, १७ टक्के आणि १० टक्के वाढ अपेक्षित
राज्यातील पहिले समूह विद्यापीठ मुंबईत स्थापन

२०१३-१४ सालचे १६.५० लाख कोटी रुपयांचे उत्पन्न २०१८-१९ मध्ये २६.६० लाख कोटी इतके झाले आहे. राज्याचे दरदोई उत्पन्न २०१७-१८ मध्ये १ लाख ७६ हजार १०२ रुपये होते ते वाढून २०१८-१९ मध्ये १ लाख ९१ हजार ८२७ रुपये इतके आहे. मध्य प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यापेक्षा ते अधिक आहे. - सुधीर मुनगंटीवार


Web Title: Foreign investment of four lakh crores in the state - Mungantiwar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.