अंदाज अतिवृष्टीचा आणि पडले ऊन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 06:20 AM2019-09-20T06:20:01+5:302019-09-20T06:20:09+5:30

‘हवामान खात्याचे अंदाज हे चुकण्यासाठीच असतात...’

The forecast is heavy rain and fall wool | अंदाज अतिवृष्टीचा आणि पडले ऊन

अंदाज अतिवृष्टीचा आणि पडले ऊन

Next

मुंबई : ‘हवामान खात्याचे अंदाज हे चुकण्यासाठीच असतात...’ असे म्हणत हवामान खात्याची खिल्ली उडविली जाते. आणि याचा प्रत्यय प्रत्यक्षात मुंबईकरांना गुरुवारी अनुभवास आला. कारण भारतीय हवामान शास्त्र विभागाने गुरुवारी मुंबईला अतिवृष्टीचा इशारा दिला होता. प्रत्यक्षात्र मात्र गुरुवारच्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मुंबईत उन्हाळ्यासारखे कडकडीत ऊन पडले होते. पण सुर्यास्तानंतर काही काळ पावसाने हजेरी लावली होती.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, वाऱ्याची बदलती दिशा आणि हवामानातील चढ-उतार; असे काहीसे शब्द कानावर पडले की हल्ली मुंबईकरांना धडकीच भरते. मान्सूनच्या या वेळच्या हंगामात किमान तीन ते चार वेळा बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईत तुफान पाऊस पडला; आणि मुंबापुरीची तुंबापुरी झाली. जुलै आणि आॅगस्टदरम्यान तुफान फटकेबाजी केलेला पाऊस गुरुवारी म्हणजे १९ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीसारखा कोसळेल, असा अंदाजही हवामान खात्याने मंगळवारसह बुधवारी वर्तवला. बुधवारीदेखील हा इशारा कायम राहिला.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, बुधवारी रात्री मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यावर पावसाचे ढग जमा झाले; आणि जसजशी रात्र होत गेली तसतसा पावसाचा जोर वाढत गेला. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. रात्री बारा वाजेपर्यंत हीच स्थिती कायम होती. बुधवारी रात्री कोसळणारा पाऊस पाहून हवामान खात्याच्या अंदाजानुसार गुरुवारी अतिवृष्टी होईल, अशी भीतीही मुंबईकरांना वाटू लागली. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, बुधवारी रात्री साडेबारानंतर शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी शाळांना सुट्टी जाहीर केली.
शिक्षणमंत्र्यांनी सुट्टी जाहीर केली आणि मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर ओसरू लागला. गुरुवारची पहाट उजाडली आणि पाऊस बेपत्ताच झाला. तरीही हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अतिवृष्टी होईल, अशी भीती मुंबईकरांना वाटत होती. मात्र जसजसा सूर्य डोक्यावर येऊ लागला आणि कडकडीत ऊन पडू लागले तसतसे हवामान खात्याच्या नावाने जोक्स सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले; आणि हवामान खात्याचे हसू झाले.
>फसवे हवामान खाते
हवामान खाते पूर्वी चुकीचे अंदाज देत शेतकरी वर्गाला फसवत होते. हवामान खात्याने त्यानंतर चुकीचे अंदाज देत सर्वसामान्य माणसाला फसविले. आता तर हवामान खात्याने चुकीचे अंदाज देत चक्क पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनाच फसविले आहे, अशी प्रतिक्रिया हवामान तज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी ‘लोकमत’ला दिली.
>अंदाज, सुट्टी आणि किस्से
हवामान खात्याने अंदाज द्यावा आणि शिक्षण विभागाने सुट्टी जाहीर करावी हे नित्याचे झाले आहे. यापूर्वीही असे किस्से घडले आहेत. मान्सूनचा हंगाम सुरू झाल्यापासून मुंबई शहर आणि उपनगरात आतापर्यंत तीन ते चारवेळा मोठ्या पाऊसधारा कोसळल्या आहेत. या तीनही वेळेला राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने विलंबाने म्हणजे दुपारचे सत्र सुरू होताना सुट्टी जाहीर केली आहे.
विशेषत: त्याच्या दुसºया दिवशीही हवामान खात्याने दिलेल्या अंदाजावरही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, गंमत म्हणजे त्या दिवशी पावसाने दडी मारली आहे.
>‘रेड अलर्ट’ : ४ सप्टेंबर रोजी हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघरसह रायगडला ‘रेड अलर्ट’ जारी केला होता. ४ सप्टेंबरच्या सकाळी मुंबई महापालिकेनेही आपल्या ट्विटर अकाउंटवरून मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. यासंदर्भातील दोन्ही संदेश ४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते ९ दरम्यान देण्यात आले होते. याचवेळी शिक्षण विभागाने सकाळच्या सत्रातील शाळांबाबत निर्णय घेणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र यासंदर्भातील निर्णय दुपारच्या सत्रातील शाळा भरताना घेण्यात आला.
>अंदाज खोटा ठरला
५ सप्टेंबर रोजी हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला ‘रेड अलर्ट’ जारी केला नव्हता. केवळ मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. मात्र कुठेतरी पडलेल्या तुरळक सरी वगळता हवामान खात्याने दिलेला अंदाज खोटा ठरला.
हवामान खात्याचे मौन
गेल्या २४ तासांच्या आकडेवारीनुसार हर्णे येथे ९१ मिमी, सांताक्रुझ ६९, सोलापूर ५९, रत्नागिरी ५८, ठाणे ५५ आणि माथेरान येथे ३८ मिमी पाऊस पडला आहे. तसेच बीडमध्ये ३० मिमी तर पुणे येथे २६ मिमी पाऊस झाला आहे.
औरंगाबादमध्ये ३ मिमी पाऊस पडला आहे. दरम्यान, मुंबईला गुरुवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. प्रत्यक्षात गुरुवार कोरडा गेला. याबाबत सातत्याने हवामान खात्याकडे विचारणा करण्यात आली. मात्र हवामान खात्याने यावर मौन साधले होते.
>दिवस ‘कोरडा’
५ आॅगस्ट रोजीही राज्य सरकारने ‘अतिवृष्टी’च्या शाळांना नावाखाली सुट्टी जाहीर केली होती. यासंदर्भातील निर्णय ४ आॅगस्टच्या सायंकाळी घेण्यात आला होता; आणि तशी घोषणाही करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र ५ आॅगस्टचा दिवस ‘कोरडा’ गेला. या दिवशी मुंबईसह लगतच्या परिसरात कुठेही पावसाचा थेंब कोसळला नाही.

Web Title: The forecast is heavy rain and fall wool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.