महिलेला बळजबरी दिले आलिंगन, विकृताला आंबोलीत अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 23:56 IST2020-03-02T23:56:51+5:302020-03-02T23:56:56+5:30
एकतर्फी प्रेमातून घरापर्यंत पाठलाग करत महिलेला बळजबरी आलिंगन दिल्याचा प्रकार अंधेरीत घडला.

महिलेला बळजबरी दिले आलिंगन, विकृताला आंबोलीत अटक
मुंबई : एकतर्फी प्रेमातून घरापर्यंत पाठलाग करत महिलेला बळजबरी आलिंगन दिल्याचा प्रकार अंधेरीत घडला. या प्रकरणी महिलेने पोलीस नियंत्रण कक्षावर फोन केल्यानंतर आंबोली पोलिसांनी एका विकृत व्यक्तीला अटक केली असून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका बँकेत कार्यरत असलेल्या तरुणीची त्या बँकेत काम करत असलेल्या आरोपीसोबत ओळख झाली होती. त्याचे तिच्यावर एकतर्फी प्रेम आहे. त्यातूनच तो तिचा मानसिक छळ करत होता. मूळची दिल्लीची असलेली ही मुलगी गेल्या दहा वर्षांपासून अंधेरीत पालकांसोबत राहते. तिला होणारा त्रास वाढत गेल्यावर अखेर बांगुरनगर पोलीस ठाण्यात तिने तक्रार दाखल केली. याबाबत कंपनीला समजले आणि त्यांनी आरोपीला नोकरीवरून काढून टाकले. तेव्हापासून तक्रार मागे घेण्यासाठी आरोपी पीडितेला छळू लागला. १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान तो तिला सतत फोन करत होता. रविवारी या व्यक्तीने तिच्या घरापर्यंत तिचा पाठलाग केला. त्यानंतर ‘मी तुझ्या बिल्डिंगखाली आलो आहे, मला भेट’, असा मेसेज तिच्या मोबाइलवर पाठवला. मात्र तिने त्याला दाद दिली नाही. त्यामुळे तो तिला सतत फोन करू लागला.
अखेर वैतागलेली ती तरुणी एकदाचा सोक्षमोक्ष लावायचा या उद्देशाने घरातून बाहेर पडली. तेव्हा आरोपीने ‘मी तुझ्यावर प्रेम करतो, माझ्याशी लग्न कर’, असे म्हणत तिला थेट मिठीच मारली. अखेर हा प्रकार महिलेने फोन करत पोलीस नियंत्रण कक्षावर कळविला. तेव्हा आंबोली पोलिसानी घटनास्थळी धाव घेत त्याला अटक केली.