Join us  

उमेदवारीच्या रस्सीखेचीत कोण ठरणार ‘यशवंत’? दक्षिण मुंबईत महायुतीच्या जागेचा तिढा सुटेना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 11:22 AM

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवाराच्या जागेचा तिढा संपलेला नाही.

मुंबई : दक्षिण मुंबईत उद्धवसेनेकडून अरविंद सावंत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र दुसरीकडे यांच्या विरोधातील महायुतीच्या उमेदवाराच्या जागेचा तिढा संपलेला नाही. यापूर्वी, दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी मनसे महायुतीत प्रवेश करणार का याचे उत्तर आज संध्याकाळी होणाऱ्या जाहीर सभेत येणार आहे. या जागेसाठी आता शिंदेसेना- भाजपात देखील रस्सीखेच सुरु आहे. असे असले तरी उमेदवारीच्या या रस्सीखेचीत कोण ‘यशवंत’ ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे .

दुसरीकडे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे, उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नावाचीही चर्चा असून, त्यांनी मतदारांच्या गाठीभेठी, आश्वासनांची खैरात करणे सुरू केले आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याविषयी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले, मनसे पक्षाची भूमिका गुढीपाडव्याला होणाऱ्या जाहीरसभेत मनसे प्रमुख राज ठाकरे जाहीर करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेप्रमाणे निवडणूक लढण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

 आता अचानक सोशल मीडियावर माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे दिसत आहे.  यशवंत जाधव चारवेळा महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या पत्नीला भायखळा विधानसभेतून निवडून आणले आहे. त्यांच्या पत्नी यामिनी जाधव यांनी भायखळा विधानसभेच्या आमदार असून, यशवंत जाधव हे शिवसेनेत असताना उपनेते होते. शिवसेना फुटल्यांनतर जाधव दाम्पत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश केला.

मराठी उमेदवाराचा चेहरा हवा-

१) दक्षिण मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे माजी खासदार आता शिंदेसेनेत प्रवेश केलेले मिलिंद देवरा यांना राज्य सभेवर पाठवण्यात आल्याने निवडणूक लढवण्याच्या चर्चा थांबल्या आहेत. 

२) महायुतीचा  उमेदवाराच्या शोधाचा उद्धवसेनेने प्रचारासाठी वापर केल्याचे दिसून येते, तर विरोधकांकडून याबाबत टीकाही होत आहे. 

३) शिवसेना पक्षाबाबतचा महत्त्वाचा निर्णय राहुल नार्वेकरांनी जाहीर केल्याने त्यांच्या विरोधात मतदारसंघातील मराठी मतदारांमध्ये रोषाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे भाजपाला उद्धवसेनेच्या अरविंद सावंत यांच्या विरोधात लढण्यासाठी मराठी उमेदवाराचा चेहरा असणे महत्त्वाचे आहे.

४) त्यामुळे महायुतीतील अनेकांनी दावेदारी सांगणाऱ्या या मतदारसंघात कोणाला उमेदवारीची लाॅटरी लागणार हे पाहणे लक्षवेधी ठरणार आहे.

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४मंगलप्रभात लोढाराहुल नार्वेकरयशवंत जाधव