न घेतलेल्या कर्जाच्या पैशांसाठी, ब्युटीशियनचे मॉर्फ फोटो व्हायरल
By गौरी टेंबकर | Updated: August 24, 2024 15:14 IST2024-08-24T15:14:17+5:302024-08-24T15:14:26+5:30
पवई परिसरात न घेतलेल्या कर्जाचे पैसे मागत ते न दिल्याने एका २७ वर्षीय ब्युटीशियनचे फोटो अश्लीलपणे मॉर्फ करत त्यावर अश्लील मेसेजेस लिहून व्हायरल करण्यात आला.

न घेतलेल्या कर्जाच्या पैशांसाठी, ब्युटीशियनचे मॉर्फ फोटो व्हायरल
मुंबई - पवई परिसरात न घेतलेल्या कर्जाचे पैसे मागत ते न दिल्याने एका २७ वर्षीय ब्युटीशियनचे फोटो अश्लीलपणे मॉर्फ करत त्यावर अश्लील मेसेजेस लिहून व्हायरल करण्यात आला. याप्रकरणी तिने पवई पोलिसात धाव घेतल्यावर अनोळखी व्यक्तीवर बीएनएस कायद्याचे कलम ३५६(२),३५१(४) सह कलम ६७(अ),६७ माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांना ११ ऑगस्ट रोजी सकाळपासूनच अनोळखी क्रमांकावरून व्हाट्सअप मेसेज येऊ लागले. त्यामध्ये त्यांना घेतलेल्या कर्जाचे पैसे भरण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी कोणतेही कर्ज न घेतल्याने त्यांनी मोबाईल मधून ते मेसेज डिलीट केले. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या नंबरवरून पैसे भरण्यासाठी सारखे हे मेसेज येऊ लागले. ज्यापैकी अनेक मेसेजमध्ये तक्रारदाराचा प्रोफाईल फोटो अश्लीलपणे मॉर्फ करत पाठवण्यात आला होता.
वैतागून पीडितेने १३ ऑगस्ट रोजी व्हाट्सअप अकाउंटचा सर्व डेटा डिलीट करून ते अकाउंट बंद केले. मात्र २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या काही क्लाईंटचे मोबाईल क्रमांक शोधण्यासाठी त्यांनी व्हॉट्सअप अकाउंट सुरू केले. तेव्हा त्यांना एका नंबरवरून त्यांचा चेहरा जोडलेला नग्न फोटो पाठवत त्यावर त्यांचे नाव आणि मोबाईल नंबर टाकून 'लोन फ्रॉड, अवेलेबल फॉर सेक्स' असे लिहिण्यात आले होते. त्यामुळे तक्रारदाराने त्याचे स्क्रीन शॉट काढले. तसलाच फोटो तक्रारदार काम करत असलेल्या सलूनच्या मालकाला देखील पाठवण्यात आला. त्यामुळे तक्रारदाराने बँकेत जाऊन चौकशी केली. जिथे त्यांच्या नावावर जवळपास ६० हजार रुपयांचे कर्ज असल्याचे कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले. मात्र तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार असे कोणतेही लोन त्यांनी कधीच घेतले नव्हते. त्यामुळे अखेर याप्रकरणी त्यांनी पवई पोलिसात धाव घेतली.