Join us

मुंबईकरांसाठी यंदा पिण्यासाठी पाणीच पाणी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगली वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 14:07 IST

Mumbai : यंदाच्या तुलनेत गेल्यावर्षी सातही तलावात ८५ टक्क्यांहून कमी पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्यावर्षी याच कालावधीत  ८३.७५ टक्के इतका म्हणजेच १२,१२,११२ दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा उपलब्ध होता.

मुंबई : मुंबईत पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरीही मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात मात्र दमदार पावसामुळे तब्बल ९५.९० टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा जवळपास १० ते १२ टक्क्यांनी अधिक असून यंदा मुंबईकरांसाठी पिण्यासाठी पाणीच पाणी असणार आहे. तसेच पाणी कपातीचेही टेन्शन नसेल.

मुंबईकरांसाठी ही गुड न्यूज आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावात १८ ऑगस्टपर्यंत तब्बल १४,४७, ३६३ लाख दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याचे मुंबई महापालिकेने म्हटले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत सात तलावात ८३. ७५ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध होता.

तुळसी, तानसा, विहार, भातसा, मोडकसागर, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा या तलावातून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. काही दिवसांपूर्वी विहारही भरुन वाहू लागला. त्यामुळे तलावात वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. सातही तलावातील पाणी क्षमतेपेक्षा अधिक पाणीसाठा यंदा उपलब्ध झाला आहे. 

गेल्या वर्षी तलावात कमी पाणीसाठा यंदाच्या तुलनेत गेल्यावर्षी सातही तलावात ८५ टक्क्यांहून कमी पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्यावर्षी याच कालावधीत  ८३.७५ टक्के इतका म्हणजेच १२,१२,११२ दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा उपलब्ध होता. तर २०२० मध्ये हाच पाणीसाठा १२,००,६४२ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध होता. दरम्यान, गेल्यावर्षी तलावात मुबलक पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे मुंबईत २७ जून पासून १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती.  त्यानंतर  जुलैच्या सुरुवातीपासून दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे पाणी कपात मागे घेण्यात आली.

टॅग्स :मुंबईधरण