Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे गटाच्या मेळाव्यात जेवणाची सोय, शिवसैनिकांना फूड पॅकेट्स देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 13:37 IST

शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून यंदाच्या दसरा मेळाव्याला विशेष प्राधान्य देत गर्दी जमविण्यासाठी स्पर्धाच चालवली आहे

विशाल हळदे

मुंबई - शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात दसरा मेळाव्याची तयारी सुरू आहे. शिंदे गटातील नेते आणि मंत्री सध्या मुंबईतील दसरा मेळाव्याच्या तयारीत आहेत. प्रत्येकजण आपल्या-आपल्या मतदारसंघातून शिवसैनिकांना मुंबईत घेऊन येण्याची तयारी करत आहे. अनेक बसेस आणि रेल्वे गाड्या बुक करण्यात आल्या आहेत. त्यासोबत खासगी वाहनांनीही मुंबईचा रस्ता धरला आहे. शिंदेगटाचा मेळावा बीकेसी मैदानावर होत असून येथे गर्दी करण्यासाठी गावखेड्यातून शिवसैनिक येत आहेत. लाखो शिवसैनिक मेळाव्याला येणार आहेत, त्यामुळे त्यांच्या रात्रीच्या जेवणाचीही सोय शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.  

शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून यंदाच्या दसरा मेळाव्याला विशेष प्राधान्य देत गर्दी जमविण्यासाठी स्पर्धाच चालवली आहे. त्यातच, आता एसटी महामंडळही मेळाव्यासाठी कामाला लागले आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड या मतदारसंघातून तब्बल ३५० एसटी महामंडाळाच्या बसेस मुंबईला येणार आहेत. त्याची तयारीही सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे इतरही आमदार आणि मंत्री आपल्या आपल्या मतदारसंघातून लोकं घेऊन येणार आहेत. या सर्वांच्या जेवणासाठी बीकेसी मैदानावर सर्वांना जेवणाची पाकीटं दिली जाणार आहेत.

शिंदे गटाच्या उद्या होणाऱ्या दसरा मेळव्यासाठी बीकेसी येथे येणाऱ्या सर्व शिवसैनिकांची रात्रीच्या खाण्याची सोय करण्यात आली आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे ही जबाबदारी असणा असून  सरनाईक यांच्याकडून ठाण्यातील प्रसिद्ध आणि उच्चभ्रू प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानाला 2 ते अडीच लाख फूड पकेट्सची ऑर्डर देण्यात आली आहे. त्यामुळे, प्रशांत कॉर्नरही कामाला लागले असून शिवसैनिकांच्या रात्रीच्या पेटपुजेसाठी तयारी सुरू झाली आहे.  

या फूड पॅकेट्मध्ये धपाटे, ठेपला, कचोरी, गुलाबजाम असे चविष्ट पदार्थ असून प्रत्येक शिवसैनिकाला ते पॅकेट दिले जाणार आहे.  खिचडी, वडापाव, समोसा असे पदार्थ न देता चविष्ट आणि स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी दसरा मेळाव्यातील शिवसैनिकांना मिळणार आहे.  

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनादसराप्रताप सरनाईक