यंदा जेवण अधिक मसालेदार; लालबाग मार्केटमध्ये मसाल्याची मागणी ३० टक्क्यांनी वाढली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 10:09 IST2025-04-21T10:08:58+5:302025-04-21T10:09:23+5:30

मिरचीचा तोरा उतरला, दरवर्षी ग्राहकांकडून घाटी, मालवणी तसेच घरगुती मसाल्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते

Food is spicier this year; Demand for spices in Lalbaug market increases by 30 percent | यंदा जेवण अधिक मसालेदार; लालबाग मार्केटमध्ये मसाल्याची मागणी ३० टक्क्यांनी वाढली 

यंदा जेवण अधिक मसालेदार; लालबाग मार्केटमध्ये मसाल्याची मागणी ३० टक्क्यांनी वाढली 

मुंबई : यंदा मिरचीच्या दरांमध्ये साधारणत: किलोमागे १०० रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांकडून मसाल्याची मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी वाढली आहे. लालबागच्या मसाला मार्केटमधील उलाढाल वाढल्याने व्यापाऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. 

दरवर्षी उन्हाळ्यात महिलांकडून वर्षभरासाठी लागणाऱ्या तिखटाची, विविध प्रकारच्या मसाल्यांची तजवीज केली जाते. दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात लाल मिरचीच्या खरेदी करण्यापासून ते मसाले तयार करण्यासाठी महिलांच्या लालबाग येथील मसाला मार्केटमध्ये रांगा लागतात. गेल्या वर्षी बाजारात मिरचीच्या किमती चढ्या होत्या, त्यामुळे अनेक महिलांनी वर्षभराचा मसाला करतानाही हात आखडता घेतल्याचे मंगला सावंत यांनी सांगितले. आम्ही दरवर्षी पाच किलो मिरच्यांचा मसाला करून ठेवतो, मात्र गेल्यावर्षी मिरच्या इतक्या महाग होत्या की तीनच किलोचा मसाला तोही कसाबसा केला, असे त्यांनी सांगितले. 

गेल्या वर्षी गुजरातमधून आलेल्या मिरच्या ग्राहकांनी घेतल्या, मात्र त्या चवीला आणि रंगालाही योग्य नसल्याचे ग्राहकांच्या लक्षात आले. त्यामुळे यंदा त्या मिरच्यांकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. यंदा नेहमीच्याच मिरच्यांकडे ग्राहकांचा कल आहे. - विक्रम चव्हाण, मसाले विक्रेते

सावजी, आगरी मसाल्याला पसंती
दरवर्षी ग्राहकांकडून घाटी, मालवणी तसेच घरगुती मसाल्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. गेल्या दोन वर्षांपासून विदर्भातील ग्राहकांकडून तसेच वेगळेपण म्हणून अन्य भागांतील ग्राहकांकडूनही सावजी मसाला आणि आगरी मसाल्याची मागणी नोंदवली जात आहे, असे मसाले विक्रेते खामकर यांनी सांगितले.

उच्च दर्जाचा मसाला १,२०० रुपये किलो
यंदा मिरची पूड ६०० रुपये प्रति किलोला मिळत आहे. अत्यंत चांगल्या प्रकारचा आणि सर्व मसाले वापरलेला एक किलो मसाला हा १,१०० ते १,२०० रुपयांपर्यंत, तर कमी प्रतीचा मसाला हा ८०० रुपयांपर्यंत उपलब्ध होत आहे. अत्यंत उच्च प्रतीच्या मिरच्या आणि जास्तीत जास्त जिरे, मिरची पूड, खोबरे, हिरवी वेलची, वेलची, काळीमिरी यांचा जास्तीचा वापर केल्यास एक किलोचा खर्च हा दोन हजार रुपयांपर्यंत जात असल्याचे विक्रेते विक्रम चव्हाण म्हणाले. 

मिरचीचे दर असे... 
मसाले तयार करण्यासाठी लवंगी मिरची, बेगडी मिरची, काश्मिरी मिरची आणि बारीक मिरची यांचा वापर केला जातो. त्यात सर्वाधिक दर काश्मिरी मिरचीचा असून, ती ४५० ते ५०० रुपये प्रति किलोच्या आसपास आहे. त्या पाठोपाठ बेगडी मिरची ही ३०० रुपये किलोच्या आसपास आहे. इतर मिरच्याही २५० ते ४०० रुपये प्रति किलोच्या घरांत आहेत. गेल्या वर्षी याच मिरच्यांची किंमत शंभर रुपयांनी अधिक होती.

Web Title: Food is spicier this year; Demand for spices in Lalbaug market increases by 30 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.