नव्या वर्षांत पंचतारांकित हाॅटेल्सवरही कारवाईचा बडगा, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

By स्नेहा मोरे | Published: January 3, 2024 07:39 PM2024-01-03T19:39:28+5:302024-01-03T19:39:54+5:30

Mumbai News: मागील वर्षांत वांद्रे येथील हाॅटेलमध्ये खाद्यपदार्थांत उंदीर सापडल्याने खळबळ माजली होती. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने अन्न सुरक्षेच्या दृष्टिने कारवाईचा बडगा उचलत शहर उपनगरातील हाॅटेल्सची तपासणी मोहिम हाती घेतली.

Food and Drug Administration to take action on five-star hotels in the new year | नव्या वर्षांत पंचतारांकित हाॅटेल्सवरही कारवाईचा बडगा, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

नव्या वर्षांत पंचतारांकित हाॅटेल्सवरही कारवाईचा बडगा, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

 मुंबई - मागील वर्षांत वांद्रे येथील हाॅटेलमध्ये खाद्यपदार्थांत उंदीर सापडल्याने खळबळ माजली होती. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने अन्न सुरक्षेच्या दृष्टिने कारवाईचा बडगा उचलत शहर उपनगरातील हाॅटेल्सची तपासणी मोहिम हाती घेतली. या तपासणी मोहिमेत हाॅटेल्सवर कारवाई करत सुधारणा नोटीसाही पाठविण्यात आल्या. आता या मोहिमेचा नव्या वर्षांत विस्तार करत शहर उपनगरातील नामांकित पंचतारांकित हाॅटेल्सचीही तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

यंदा शहर उपनगरातील पंचतारांकित हाॅटेल्समध्येही स्वच्छतेचे नियम, कचराकुंड्या, खाद्यपदार्थांची साठवणूक, परवाना नूतनीकरण, कर्मचारी आरोग्य तपासणी, भेसळयुक्त पदार्थ अशा विविध निकषांवर ही तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. मागील काही वर्षांपासून माॅल्समध्ये असणारे खाद्यपदार्थांचे स्टाॅल्स, आऊटलेटची संख्याही वाढतेय, या ठिकाणी तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली आहे. पंचतारांकित हाॅटेलसह रस्तोरस्ती, गल्लोगल्ली वाढत असणाऱ्या खाद्यविक्रेत्यांवरही एफडीएची टीम तपासणी करणार आहे. मात्र ग्राहकांनीही दक्षता राखून अन्न सुरक्षेविषयी जागरुक राहून प्रशासनाकडे तक्रार करणे गरजेचे असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनानचे (अन्न) सहआयुक्त शैलेश आढाव यांनी दिली आहे.

डिसेंबर अखेरीस, अन्न व औषध प्रशासन विभागाने नवीन वर्षांच्या पार्श्वभूमीवर शहर उपनगरातील ६७ हाॅटेल्सवर कारवाई केली. त्यात स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन हे प्रमुख कारण होते. तसचे, नुकतेच लोअरपरळ येथील बदमाश या नामांकित हाॅटेललाही विनापरवाना व्यवसाय करत असल्याने काम थांबविण्याची नोटीस देण्यात आली आहे.

चौपाट्या, गल्लोगल्लीतील फेरीवाल्यांबाबत दक्ष रहा
अनेकदा चौपाट्या, गल्लोगल्लीतील फेरीवाल्यांची संख्या वाढतेय. या फेरीवाल्यांकडून निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ, दूषित पाणी- बर्फाचा वापर, भेसळयुक्त पदार्थांचा वापर करण्यात येतो. मात्र बाह्य स्वरुप पाहून अनेकदा ग्राहकांची फसवणूक होते, आणि अन्न बाधेच्याही घटना घडतात. त्यामुळे ग्राहकांनी अशा फेरीवाल्यांकडून खाद्यपदार्थ घेताना काळजी घेतली पाहिजे, अधिक दक्षता घेतली पाहिजे, असे आवाहनही अधिकाऱ्यांनी केले आहे.

Web Title: Food and Drug Administration to take action on five-star hotels in the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.