मुंबई : सणासुदीच्या काळात राज्यात विशेषतः मुंबईमध्ये भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. मात्र अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने जानेवारी महिन्यापासून तक्रारींची दखल घेत धाडी टाकण्यास सुरुवात केली. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत २५८ छापे टाकण्यात आले असून दुधाचे ५४३ नमुने अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी गोवंडीच्या बैंगणवाडी परिसरातील एका दुग्धालयात दुधात भेसळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. गोवंडीतील एका रहिवाशाने या डेअरीतून दूध विकत घेतले. मात्र, त्यांना काही संशय आल्याने ते गरम केल्यानंतर त्यात चिंच टाकून पाहिली. मात्र दूध फाटले नाही. त्यानंतर त्यात लिंबाचा रस मिसळला आणि तीन-चार तास प्रतीक्षा केल्यानंतरही दुधात काही फरक पडला नाही. त्यामुळे दुधात सिंथेटिक, रासायनिक पदार्थांचा वापर करण्यात आल्याचा संशय बळावला. याबाबत शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ते दुधाचे वाहन ताब्यात घेतले.
अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी असे काही प्रकार उघडकीस आल्यानंतर मुंबईच्या चारही चेक नाक्यांवर छापे टाकून भेसळयुक्त दूध मुंबईत येऊ नये याची खबरदारी घेतल्याचे दिसून आले. सणासुदीचे दिवस जवळ आल्याने मुंबईत भेसळयुक्त दूध येऊ नये याची काळजी घेण्याचे निर्देश विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत, असे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले.
दूध प्रतिबंधात्मक उपायांना प्राधान्यक्रमदूध व दुग्धजन्य पदार्थात होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आणि दुग्ध व्यवसाय विभाग यांच्या समन्वयाने संयुक्त धडक मोहिमा राबवण्याचा निर्णय झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात भेसळयुक्त दूध प्रतिबंधात्मक उपाय योजण्याला प्राधान्यक्रम देण्यात आला होता.
९८ टँकरची तपासणीदोन-तीन महिन्यांपूर्वी मुंबईतील मुलुंड चेक नाका, मानखुर्द चेक नाका, दहिसर चेक नाका, ऐरोली चेक नाका येथे ९८ दुधाच्या टँकरची तपासणी करण्यात आली. यावेळी मानखुर्द येथे तपासल्या वाहनात कमी दर्जाचे दूध आढळून आल्याने वाहन परत पाठवण्यात आले.