गोरेगावमधील उड्डाणपूल मे महिन्यापर्यंत सेवेत; दिंडोशी न्यायालय ते फिल्म सिटीदरम्यान उभारणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 12:50 IST2025-10-04T12:49:55+5:302025-10-04T12:50:36+5:30
गोरेगाव-मुलुंड जोडमार्ग प्रकल्पांतर्गत (जीएमएलआर) दिंडोशी न्यायालय ते फिल्मसिटी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे.

गोरेगावमधील उड्डाणपूल मे महिन्यापर्यंत सेवेत; दिंडोशी न्यायालय ते फिल्म सिटीदरम्यान उभारणी
मुंबई : गोरेगाव-मुलुंड जोडमार्ग प्रकल्पांतर्गत (जीएमएलआर) दिंडोशी न्यायालय ते फिल्मसिटी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. या पुलाच्या एकूण ३१ पैकी २७ खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. सध्या रत्नागिरी जंक्शन येथे आणखी चार खांब उभारण्याचे काम जोमाने करण्यात येत आहे. पालिकेच्या नियोजनानुसार आवश्यक कामे पूर्ण करून येत्या १६ मेपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट पालिकेच्या पूल विभागाचे आहे. या कामांमध्ये खांबांवर गर्डर ठेवणे, डेक स्लॅब ओतकाम, उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंचे पोहोच मार्ग यांचा समावेश आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी या उड्डाणपुलाच्या कामाचा शुक्रवारी आढावा घेतला.
‘जीएमएलआर’ एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित असून तिसऱ्या टप्प्यातील भाग (अ) मध्ये उड्डाणपूल, एलिव्हेटेड रोटरी बांधकामाचा समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत दिंडोशी-गोरेगाव- फिल्मसिटी दरम्यान सहापदरी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्याची लांबी एक हजार २६५ मीटर आहे.
गोरेगाव ते मुलुंड २५ मिनिटांत
गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग हा मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणारा चौथा प्रमुख जोडरस्ता आहे. यामुळे १२.२० किलोमीटरच्या या प्रकल्पामुळे गोरेगाव ते मुलुंडदरम्यान प्रवासाचा कालावधी ७५ मिनिटांवरून २५ मिनिटांपर्यंत येईल.
बाधितांचे लवकरच पुनर्वसन
पुलाच्या दिंडोशी न्यायालय बाजूकडील पोहोच मार्गाचे बांधकाम ३१ जानेवारी २०२६, तसेच फिल्मसिटी येथील पोहोच मार्गाचे बांधकाम ३० एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. बांधकामानंतरची इतर आनुषंगिक कामे उर्वरित १५ दिवसांत केली जातील. उड्डाणपुलाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत मुलुंड बाजूकडे काही बांधकामे बाधित होत आहेत. बाधित बांधकामांची पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करून ती जागा उपलब्ध करून घेण्यात येईल. जेणेकरून, या भागातील पुलाच्या कामास गती मिळेल.