Join us

ठाणे, रायगड, पालघरला मुसळधारेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 05:40 IST

बंगाल खाडीत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव; मुंबईत अधूनमधून सरी बरसणार

मुंबई : बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाड्यावर पुढील काही दिवस प्रभाव राहणार असून, याचा परिणाम म्हणून ठिकठिकाणी मान्सून अधिक वेगाने सक्रिय होईल. येत्या तीन ते चार दिवसांत मध्य महाराष्ट्र, कोकण, कर्नाटकाचा किनारी भाग, पूर्व राजस्थान, गुजरातमध्ये मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलाआहे.मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुंबईत मात्र अधूनमधून सरी बरसतील. गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, कर्नाटकाचा किनारी भाग आणि केरळमध्ये मान्सून मोठ्या प्रमाणावर सक्रिय होता.आज कोकण, गोव्यात अतिवृष्टी७ ऑगस्ट : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.८ ऑगस्ट : कोकण, गोवा,मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल.९ ऑगस्ट : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, तर कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेट