गोरेगावात म्हाडाच्या लॉटरीतील फ्लॅट विक्रीचा बनाव, ३६ लाखांना गंडवलं; राहतं घरंही गेलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 17:17 IST2026-02-24T17:16:27+5:302026-02-24T17:17:09+5:30
म्हाडाच्या लॉटरीत मिळालेला फ्लॅट विक्रीस असल्याचा बनाव करुन एका दाम्पत्याने गोरेगाव पश्चिमेतील जनार्दन काटकर (६६) या निवृत्त व्यक्तीची ३६ लाख रुपयांची फसवणूक केली.

गोरेगावात म्हाडाच्या लॉटरीतील फ्लॅट विक्रीचा बनाव, ३६ लाखांना गंडवलं; राहतं घरंही गेलं
म्हाडाच्या लॉटरीत मिळालेला फ्लॅट विक्रीस असल्याचा बनाव करुन एका दाम्पत्याने गोरेगाव पश्चिमेतील जनार्दन काटकर (६६) या निवृत्त व्यक्तीची ३६ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी २१ फेब्रुवारीला सुधा दुबे व तिचा पती सुनीलकुमार दुबे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जनार्दन काटकर यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये गोरेगाव पूर्वेतील स्वत:चा फ्लॅट विकला. त्यानंतर म्हाडा कॉम्प्लेक्स, पहाडी गोरेगाव येथील स्वराज्य को.ऑप.हाऊसिंग सोसायटीमधील फ्लॅट खरेदी करण्यासाठी त्यांनी ओळखीचे इस्टेट एजंट रवींद्र नकाशे यांच्या माध्यमातून दत्ताराम दळवी, पवनकुमार महतो व सनमुगम अमावासे कौंडर यांच्याशी संपर्क साधला. या एजंटनी गोरेगाव पश्चिमेच्या म्हाडा कॉम्प्लेक्स ३ ई/२०८ हा फ्लॅट नवी मुंबईच्या घनसोलीमध्ये वास्तव्याला असलेल्या सुधा सुनीलकुमार दुबे हिच्या नावावर असून तो २०२३ च्या म्हाडा लॉटरीत मिळाल्याचे सांगितले. तसेच फ्लॅटची किंमत ३८ लाख रुपये ठरविण्यात आली. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी कागदपत्रे तयार करुन त्यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
कागदपत्रांवर खोटा पत्ता देत फसवणूक
काटकर यांनी ठरलेल्या रकमेपैकी टप्प्याटप्प्याने एकूण ३८ लाखांपैकी ३६ लाख रुपये त्यांनी अदा केले. उर्वरित २ लाख रुपये फ्लॅटचा ताबा आणि कागदपत्रे मिळाल्यानंतर देण्याचे ठरले होते. मात्र, मार्च २०२५ पासून दुबे दाम्पत्याने ताबा देण्यास टाळाटाळ सुरू केली. वारंवार संपर्क करुनही प्रतिसाद मिळाला नाही. जून व ऑगस्ट २०२५ मध्ये दिलेल्या पत्त्यावर भेट दिली असता तेथे संबंधित वास्तव्यास नसल्याचे आढळले. त्यानुसार कागदपत्रांवर खोटा पत्ता नमूद करुन फसवणूक केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.