भांडुपमध्ये फ्लेमिंगो पार्क! उपनगर जिल्ह्याच्या विकासासाठी ९७६ कोटी रुपयांची तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 08:55 IST2023-07-13T08:54:44+5:302023-07-13T08:55:02+5:30
समितीची बैठक बुधवारी चेतना महाविद्यालय येथे झाली. त्यास मुंबई उपनगरातील आमदार व खासदार उपस्थित होते.

भांडुपमध्ये फ्लेमिंगो पार्क! उपनगर जिल्ह्याच्या विकासासाठी ९७६ कोटी रुपयांची तरतूद
मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विकासासाठी २०२३-२४ च्या जिल्हा वार्षिक योजनेत ९७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन अंतर्गत प्रत्येक वॉर्डच्या कार्यक्षेत्रातील झोपडपट्टीत रस्ते काँक्रिटीकरणाबरोबरच मूलभूत सोयीसुविधांचा विकास करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. महापालिकेच्या दोन हजार शाळांमध्ये व्यायामशाळा उभारण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला गोराईत दिलेल्या जागेवर विविध पर्यटन विकास प्रकल्प, भांडुप फ्लेमिंगो पार्क येथे पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा, पूर्व उपनगरातील खाडी किनाऱ्यांवर पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. समितीची बैठक बुधवारी चेतना महाविद्यालय येथे झाली. त्यास मुंबई उपनगरातील आमदार व खासदार उपस्थित होते.
महिला व बालभवन प्रस्तावित
महिला व बाल विकासाच्या १८ कोटी रुपयांच्या निधीमधून मुंबई उपनगरात महिला व बाल भवन बांधण्याचे प्रस्तावित आहे. चेंबूर येथील चिल्ड्रन एड सोसायटीच्या मोकळ्या जागेत हा प्रकल्प हाती घेण्यात येईल. महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मॉलच्या धर्तीवर इमारत बांधणे, महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हास्तरीय संस्थांचे बळकटीकरण करण्यात येईल, असेही लोढा यांनी यावेळी सांगितले.
कौशल्य विकास कार्यक्रमासाठी ५ कोटी रुपये महिला व बाल विकासासाठी ३ टक्के निधी अंतर्गत प्रकल्प १८ कोटी रुपये
दलितवस्ती सुधार योजनेसाठी ४७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.