माणुसकीची ज्योत - ‘लाेक-शास्त्र सावित्री’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 08:21 AM2021-01-31T08:21:05+5:302021-01-31T08:21:52+5:30

सावित्रीसारखे जगण्याचे निर्णय घेताना आपल्या प्रत्येकाचे तळ्यात-मळ्यात होते. माणूस म्हणून जगण्याची इच्छा असूनही आपण पुढाकार घेत नाही. त्या पुढाकारासाठी ‘लोक-शास्त्र सावित्री’ हे नाटक उत्प्रेरित करते. माणुसकीची न्यायसंगत, विवेकसंमत आणि वैचारिक दृष्टी प्रदान करते.

The Flame of Humanity - 'Laek-Shastra Savitri' | माणुसकीची ज्योत - ‘लाेक-शास्त्र सावित्री’

माणुसकीची ज्योत - ‘लाेक-शास्त्र सावित्री’

Next

- - सायली पावसकर


सावित्रीबाई फुलेंनी महाराष्ट्रातील पुरोगामित्वाचा नवा पाया रचला होता. आधुनिकतेचा बदल विचारांनी स्वीकारला. त्यांनी संघर्षाची मशाल हाती घेतली; परंतु त्याची धग जनमानसाच्या मनात आजही धगधगते का? आजच्या आधुनिक समाजात सावित्रीचा वारसा चालवणारे, महिला सक्षमीकरणाचे नारे देणारे, महिलांच्या सबलीकरणाच्या हेतूने पुरोगामी चळवळ चालवणारे खरंच पुरोगामी आहेत का? आणि जर आहेत तर आजच्या काळात ही महिलांची अशी स्थिती, अशी अवस्था का? मग नेमकी पुरोगामी असण्याची व्याख्या काय?
आम्ही थिएटर ऑफ रेलेवन्सचे रंगकर्मी रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित-दिग्दर्शित ‘लोक-शास्त्र सावित्री’ या युगपरिवर्तक नाटकातून मृतावस्थेत असलेल्या समाजात सांस्कृतिक चेतनेची ठिणगी पेटवत आहोत. सांस्कृतिक सृजनकार या नवीन संकल्पनेने आम्ही एका नव्या पर्वाची सुरुवात करत आहोत. शेण आणि दगडांचा मार खाऊन सावित्रीने अस्पृश्यता आणि अज्ञानाची भिंत तोडली, तिची ही ओळख प्रत्येकाला माहीत आहे.  ‘लोक-शास्त्र सावित्री’ हे नाटक त्या सावित्रीविषयी बोलते जी माझ्या, तुमच्या, आपल्या प्रत्येकाच्या आत जन्म घेते. सावित्रीची समाजमान्य व माहीत असलेली भूमिका व जीवनयात्रा हे नाटक दाखवत नाही, तर सावित्री आपल्या आत कुठे आहे, याचा शोध घेण्यास उत्प्रेरित करते.
सावित्रीबाई फुले एक जिवंत चळवळ, अमूर्त दूरदृष्टीचे मूर्त आंदोलन आहे. सामाजिक अन्यायातून मुक्तीसाठी भारतीय संविधानाच्या सार्वभौम व समतावादी मूल्यांना त्यांनी त्या काळात रुजवले. सावित्रीचा संघर्ष, पितृसत्ताक समाजाविरुद्धचा बंड, जातीय विषमता मोडीस काढण्याचा वैचारिक पुढाकार या सर्व पैलूंना जागतिकीकरणाने जाणीवपूर्वक केवळ शिक्षणाच्या कुंपणात मर्यादित केले. त्यांची खरी ओळख समाजापर्यंत पोहोचूच दिली नाही. म्हणून परंपरेच्या नावाखाली आजही सामाजिक अन्याय आणि शोषण सुरू आहे, त्याला हे नाटक उजागर करते. ‘लोक-शास्त्र सावित्री’ हे नाटक सामाजिक रूढी व्यवस्थेला केवळ प्रश्नच नाही विचारत, तर त्या व्यवस्थेला बदलण्यासाठी त्याच्या मुळाशी जाऊन समाधानाचा शोध घेते. हे नाटक शिक्षित किंवा अज्ञानी या भेदाला खोडते. असे म्हटले जाते की, माणूस शिक्षणाने माणूस होतो, पण खरेच तसे घडते का? शिक्षण माणसाला न्यायसंगत करते का? आणि जर तसे आहे तर मग बहिणाबाई कोण होत्या ? बहिणाबाई तर अशिक्षित राहूनही माणूस म्हणून जगल्या. सावित्रीबाई आणि बहिणाबाई हे दोन ध्रुव आहेत. एक आहे विचार स्वरूपात अस्तित्व निर्माण करण्याचे आणि दुसरे आहे, जीवनदृष्टीने तत्त्व जागवण्याचे व या दोघांचा एकत्र येण्याचा बिंदू आहे माणुसकी. सावित्रीसारखे जगण्याचे निर्णय घेताना आपल्या प्रत्येकाचे तळ्यात-मळ्यात होते. माणूस म्हणून जगण्याची इच्छा असूनही आपण पुढाकार घेत नाही. त्या पुढाकारासाठी हे नाटक उत्प्रेरित करते.
महाराष्ट्रातल्या संस्कृतीची संपन्नता म्हणजे लोककला. जनमानसाचे जीवन, सामाजिक जडणघडण, अनुभवांनी संपन्न असलेली लोकसंस्कृती आणि ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ नाट्यतत्त्वाचे शास्त्र मिळून निर्माण झालेल्या लोक-शास्त्राचे कलात्मक दर्शन लोक-शास्त्र सावित्री नाटक घडवते. या नाटकातील लेखकीय सौंदर्य, मानवीय संवेदनशीलतेला स्पर्श करते. हे नाटक केवळ भावस्पर्शी नाही, तर विद्रोहाचा प्रतिरोध आहे. सांस्कृतिक क्रांतीचे व सृजनशील परिवर्तनाचे वैचारिक आंदोलन आहे. सांस्कृतिक क्रांती ही कधीच नरसंहार करत नाही, रक्तपाताने झालेली क्रांती, ‘सांस्कृतिक क्रांती’ कधीच असू शकत नाही. कारण क्रांती मनुष्याला उन्मुक्त करण्यासाठी आहे. सहृदयता, न्याय, समता, समानतेला प्रस्थापित करण्यासाठी आहे. अर्थहीन होत असलेल्या जागतिकीकरणाच्या काळात सांस्कृतिक क्रांती विश्वाला मानवीय कल्याणासाठी प्रतिबद्ध करण्यासाठी आहे. आज देश व जगात सुरू असलेल्या अनेकपदरी आव्हानांसमोर जाताना एक व्यक्ती, एक कलाकार, एक नागरिक सोबतच सांस्कृतिक सृजनकार या भूमिकेला आपण समजणे आवश्यक आहे. कारण सांस्कृतिक सृजनकारच काळाला नव्याने घडवू शकतात.

Web Title: The Flame of Humanity - 'Laek-Shastra Savitri'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.