Join us  

४ वर्षांच्या चिमुकल्याचा कच-याच्या डंपरखाली येऊन मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2018 1:32 PM

पाच बहिणींचा एकुलत्या एक लहान भावाचा दुर्दैवी अंत

मुंबई - शिवाजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चार वर्षांच्या चिमुकल्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. शिवाजीनगरमध्ये कच-याच्या गाडीखाली येऊन मोहम्मद गौर दस्तगीर मोहम्मद नावाच्या ४ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाल्यानं  खळबळ उडाली आहे. शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुलाच्या मृत्यूमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.  

शिवाजी नगरच्या प्लॉट क्रमांक २८ आणि २९ च्या मध्ये असलेल्या रस्ते क्रमांक ४ वर घरातून मोहम्मद गौर हा बहिणीसोबत बाहेर आला आणि अचानक समोरून येणाऱ्या कचऱ्याच्या  डंपरखाली चिरडला गेला. डंपरच्या उजव्या बाजूच्या मागच्या टायरखाली चिरडलेल्या चिमुकल्या गौरला स्थानिकांनी राजावाडी रुग्णालय उपचारासाठी दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ५ बहिणींमध्ये हा एक भाऊ असल्याने तो सगळ्यांचा लाडका होता. त्याचे वडील दुबई येथे नोकरी करतात. त्याच्या मृत्यूने या परिसरात शोककळा पसरली आहे. या परिसरातून ये-जा करणाऱ्या कचऱ्याच्या डंपरबाबत स्थानिक जनतेमध्ये मोठी नाराजी पसरली असून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या, या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

टॅग्स :अपघातमृत्यू