पाच हजार एकर जागेवरील तिवरे विकास प्रकल्पांमुळे नष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 08:12 IST2024-12-14T08:11:52+5:302024-12-14T08:12:19+5:30
कन्झर्वेशन ॲक्शन ट्रस्टच्या अभ्यासामधील निष्कर्ष

पाच हजार एकर जागेवरील तिवरे विकास प्रकल्पांमुळे नष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सेवा सुविधांचा विकास करताना सुमारे तीन हजार एकरांवरील तिवरांची हानी झाली आहे, तर दोन हजारांवरील एकरावरील तिवरे बिल्डरांकडून करण्यात आलेल्या बांधकामांसह अतिक्रमणांमुळे नष्ट झाली आहेत. अशी एकूण पाच हजार एकरवरील तिवरांची हानी झाल्याचे कन्झर्वेशन ॲक्शन ट्रस्टने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कन्झर्वेशन ॲक्शन ट्रस्टकडून पर्यावरणाच्या हानीचा अभ्यास केला जात असून, गेल्या दहा वर्षांत मुंबई महानगर प्रदेशात झालेल्या बांधकामांदरम्यान ही हानी झाली आहे. मेट्रो, मोनो, बुलेट ट्रेनसोबत कोस्टल रोडसारख्या विकासकामांचा या प्रकल्पांत समावेश आहे. या प्रकल्पांची कामे करताना सुमारे तीन हजार एकरांवरील तिवरांचे जंगल कमी झाले आहे, तर दोन हजार एकरांवरील तिवरांचे जंगल हे बिल्डर आणि अनधिकृत बांधकामांनी नष्ट झाले आहे, असे हा अभ्यास म्हणतो.
काय सांगतो अभ्यास?
सर्वेक्षणासाठी उपग्रहाच्या छायाचित्रांचा आधार घेण्यात आला आहे. शिवाय प्रत्यक्षात घटनास्थळी भेटी देण्यात आल्या आहेत.
उत्तन ते दहिसरमधील सुमारे ७०० एकरांवरील तिवरांचा ऱ्हास झाला
आहे.
पहाडी गोरेगावमधील परिसरात १९९४, १९९८ आणि २०१८ मध्ये
बदल होत गेले असून, पाणथळ जमिनी नष्ट झाल्या आहेत.
माहुलमधील परिसरातही १९९८, २००० आणि २०१९ मध्ये बदल झाले असून, खाडी किनारे नष्ट झाले आहेत.
नेरूळमध्येही १९९४, २००३, २०१९ मध्ये बदल झाले असून, पाणथळ जमिनी गाडल्या गेल्या आहेत.
जैवविविधतेवर परिणाम
गेल्या काही वर्षामध्ये वाढते औद्योगिकीकरण, भूजलाचा बेसुमार उपसा आणि त्याच्या पुनर्भरणासाठी होणाऱ्या प्रयत्नांची गती कमी असणे, आणि महत्वाचे म्हणजे घनकचऱ्याची विल्हेवाट अशा पाणथळ जागांचा वापर होते. यामुळे त्या आक्रसण्याची भीती आहे. याचा परिणाम त्यांची जैवविविधतेवर होतो.
विकासकामांच्या प्रकल्पादरम्यान तोडलेल्या तिवरांचे पुनर्रोपण होणे गरजेचे आहे किंवा तशी नुकसानभरपाई मिळणे गरजेचे आहे. मात्र, त्यापैकी काहीच झालेले नाही. सीआरझेडच्या नियमांचे उल्लंन करून झालेल्या बांधकामांमुळे तिवरे नष्ट झाली आहेत.
- देबी गोएंका, कार्यकारी विश्वस्त, कन्झर्वेशन ॲक्शन ट्रस्ट
केंद्र आणि राज्य सरकार जागतिक स्तरावरील परिषदांमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या कामांचे दाखले देते. प्रत्यक्षात दुसरीकडे मात्र होणारी पर्यावरणाची हानी थांबविण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाही, हे दुर्दैव आहे.
- धर्मेश बरई,
संस्थापक, एन्वायरनमेंट लाइफ फाउंडेशन