लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या पाच आरोपींकडे फरार आरोपी आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रांची चौकशी करायची असल्याचे सांगत पोलिसांनी त्यांचा ताबा मागितला. त्यानुसार विशेष न्यायालयानेही त्या पाच आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
फरारी आरोपी शुभमन लोणकर याचा भाऊ प्रवीण लोणकर, भागवत सिंग, अक्षदीप सिंग, सलमान वोहरा आणि सुमीत वाघ अशी या पाच आरोपींची नावे आहेत. ते सर्व न्यायालयीन कोठडीत असल्याने पोलिसांनी त्यांचा ताबा न्यायालयाकडून मागितला.
बचावपक्षाच्या वकिलांनी या सर्व आरोपींची पोलिस कोठडी मागण्यासाठी कोणतीही नवी कारणे पोलिसांकडे नसल्याचा युक्तिवाद न्यायालयात केला. प्रवीण लोणकर मकोका अंतर्गत कबुलीजबाब देण्यास तयार नाही, असा युक्तिवाद वकिलांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पाच आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
यासाठी पोलिस कोठडीची मागणी
शुभमन लोणकरच्या ठावठिकाण्याबाबत चौकशी करायची असल्याने पोलिसांनी प्रवीण लोणकरची पोलिस कोठडी मागितली. तर उर्वरित आरोपींकडे शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्याबाबत आणि आर्थिक मदतीबाबत तपास करायचा असल्याने त्यांचा ताबा मागितला.