सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 22:35 IST2025-10-02T22:35:21+5:302025-10-02T22:35:52+5:30
Mumbai News: गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीसह संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर सततचा पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मासेमारी उद्योगाला जबरदस्त फटका बसला आहे. जुलैपर्यंत शासन नियमानुसार मासेमारी बंद असते,दि, १ ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात होते. परंतु यावर्षी हवामान सतत अस्थिर राहिल्याने मासेमारीला पूर्णपणे खीळ बसली आहे.

सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
मुंबई - गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीसह संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर सततचा पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मासेमारी उद्योगाला जबरदस्त फटका बसला आहे. जुलैपर्यंत शासन नियमानुसार मासेमारी बंद असते,दि, १ ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात होते. परंतु यावर्षी हवामान सतत अस्थिर राहिल्याने मासेमारीला पूर्णपणे खीळ बसली आहे.
गौरी-गणपतीपासून नवरात्रापर्यंत पावसाने थैमान घातले असून, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्रात वादळी वारे सुरु झाले. यामुळे मासेमारीसाठी गेलेल्या अनेक बोटी समुद्रात अडकून पडल्या असून, काही बोटींनी जवळच्या मुरुड, दिघी, रत्नागिरी इत्यादी बंदरांमध्ये आश्रय घेतला आहे.
मासेमारीसाठी अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे ऑगस्ट व सप्टेंबर महिने यावर्षी वाया गेले असून, मच्छिमारांचा डिझेल, बर्फ, जाळी आणि इतर खर्च वाया गेला आहे. यामुळे कोकणातील हजारो मच्छिमार कुटुंबे अडचणीत आली आहेत.
या पार्श्वभूमीवर मच्छिमार नेते प्रदीप टपके यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे,जसे शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे, तसेच समुद्रावर आपले जीवनमान अवलंबून असलेल्या मच्छिमार बांधवांनाही तत्काळ सानुग्रह मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
या गंभीर परिस्थितीकडे शासनाने त्वरित लक्ष द्यावे व मच्छिमारांना आर्थिक मदत, सवलती व पुनर्वसनाच्या उपाययोजना उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी त्यांनी केली आहे.