पहिल्यांदा पेय घेता, मग ते तुम्हाला घेते आणि शेवटी ते तुम्हाला संपवते; हायकोर्टाची टिप्पणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 09:20 IST2026-02-13T09:20:24+5:302026-02-13T09:20:24+5:30
हा प्रकार “अनपेक्षित घटना” ठरत नाही आणि त्यामुळे अर्जदार नुकसानभरपाईस पात्र ठरत नाही. मद्यपीची नुकसान भरपाईची मागणी कोर्टाने फेटाळली.

पहिल्यांदा पेय घेता, मग ते तुम्हाला घेते आणि शेवटी ते तुम्हाला संपवते; हायकोर्टाची टिप्पणी
मुंबई : ‘पहिल्यांदा तुम्ही पेय घेता, मग पेय तुम्हाला घेते आणि शेवटी तेच पेय तुम्हाला संपवते’, या अमेरिकन कादंबरीकार एफ. स्कॉट फिट्झजेराल्ड यांच्या वाक्यांचा उल्लेख करत मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे अपघातात जखमी झालेल्या मद्यधुंद व्यक्तीची नुकसानभरपाईची मागणी फेटाळली.
न्या. जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने बुधवारी दिलेल्या आदेशाची प्रत गुरुवारी उपलब्ध झाली. दारू सर्व काही उद्ध्वस्त करते, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. मुंबईतील एका रहिवाशाने २०१४ मध्ये रेल्वे लवाद न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. लवादाने रेल्वे प्लॅटफॉर्मवरील अपघातात जखमी झाल्याबद्दल नुकसानभरपाई देणे नाकारले होते. उच्च न्यायालयाने हा अपील अर्ज फेटाळताना म्हटले की, अर्जदार जखमी होण्यास कारणीभूत ठरलेली कृती ही मद्यधुंद अवस्थेत करण्यात आली होती.
न्यायालय काय म्हणाले?
अर्जदार बॉम्बे रुग्णालयात प्रयोगशाळा सहायक म्हणून कार्यरत होता, त्याने केलेल्या दाव्यानुसार, १० मार्च २००१ रोजी मध्यरात्री सुमारास तो मरीन लाइन्स स्थानकावर रेल्वेची वाट पाहत असताना येणाऱ्या गाडीची धडक बसली. त्याला प्रथम जी. टी. रुग्णालयात आणि नंतर बॉम्बे रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय नोंदीनुसार त्याने मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केले होते.
हा प्रकार “अनपेक्षित घटना” ठरत नाही आणि त्यामुळे अर्जदार नुकसानभरपाईस पात्र ठरत नाही. एखादी व्यक्ती अतिमद्यधुंद अवस्थेत प्लॅटफॉर्मच्या कडेला उभी राहते, तर तो प्रकार रेल्वे कायद्याच्या कलम १२४-अ अंतर्गत येतो, ज्यात मद्यधुंद अवस्थेतील कृतीमुळे झालेल्या अपघातासाठी नुकसानभरपाई नाकारली जाते, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.