मुंबईच्या पूर्व उपनगरात राहणाऱ्या लोकांचा प्रवास आणखी सोपा होणार आहे. लवकरच चेंबूर ते मानखुर्ददरम्यान मेट्रो (मेट्रो लाईन २बी) धावणार आहे. मुंबई मेट्रो यलो लाईनच्या पहिल्या टप्प्याची चाचणी येत्या १६ एप्रिलपासून सुरू होईल. हा मार्ग एकूण ५.४ किलोमीटर लांबीचा असेल. या मार्गावरील पाच स्थानकांची (डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल मेट्रो, मानखुर्द आणि मंडाले) कामे पूर्ण झाल्याची माहिती आहे. महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या निरीक्षणाखाली ही चाचणी केली जाणार आहे.
मेट्रो अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मेट्रो यलो लाईच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीत रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग आणि ट्रॅक ट्रॅक्शनची तपासणी केली जाईल. त्यानंतर मेट्रोमध्ये प्रवाशांच्या वजनाइतके भार टाकून चाचणी केली जाईल. या सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून अंतिम तपासणी केली जाईल. त्यानंतर ही सेवा सर्वसामन्यांसाठी सुरू केली जाईल, असे सांगण्यात आले.
मुंबई मेट्रो यलो लाईन २बी चा एकूण मार्ग १८.२ किमी लांबीचा आहे, जो डायमंड गार्डन (चेंबूर) ते डीएन नगर (अंधेरी) पर्यंत पसरलेला आहे. या मार्गावर एकूण १४ स्थानके असतील आणि दरम्यान, डिसेंबर २०१५ पर्यंत या मेट्रो लाइनचे काम पूर्ण केले जाणार आहे. पहिल्या टप्यात मेट्रो चेंबूर ते मानखुर्ददरम्यान धावणार आहे.
१६ एप्रिल हा दिवस भारतीयांसाठी खूप खास आहे. कारण या दिवशी भारतातील पहिली प्रवासी रेल्वे (मुंबई ते ठाणे) धावली. त्यामुळे हा दिवस भारतीय रेल्वे स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. आता याचदिवशी मुंबई मेट्रो यलो लाईनच्या पहिल्या टप्प्याची चाचणी केली जाणार आहे.