पहिली स्लीपर वंदे भारत मुंबईत आली; चाचणी यशस्वी झाली, कधीपासून अन् कुठे होणार सेवा सुरू?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 17:29 IST2025-01-15T17:25:46+5:302025-01-15T17:29:09+5:30
First Sleeper Vande Bharat Train In Mumbai: स्लीपर वंदे भारत ट्रेनची चाचणी देशातील विविध भागांमध्ये घेतली जात आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेन मुंबईत आली आहे.

पहिली स्लीपर वंदे भारत मुंबईत आली; चाचणी यशस्वी झाली, कधीपासून अन् कुठे होणार सेवा सुरू?
First Sleeper Vande Bharat Train In Mumbai: वंदे भारत ट्रेनची क्रेझ अद्यापही भारतीय प्रवाशांमध्ये कायम आहे. वंदे भारत ट्रेनची सेवा देशभरात सुरू आहे. प्रवाशांकडून वंदे भारत ट्रेनला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीने भारतीय रेल्वेने एक नव्या अध्यायाला सुरुवात केली आहे. प्रवाशांचे हित लक्षात घेता भारतीय रेल्वेने वंदे भारत ट्रेनची वैविध्यपूर्ण प्रकार आणले. यामध्ये अमृत भारत ट्रेन, वंदे भारत मेट्रो यांचा समावेश आहे. आता वंदे भारत ट्रेनचा आणखी एक प्रकार लवकरच भारतीय प्रवाशांचा सेवेत असणार आहे, तो म्हणजे वंदे भारत स्लीपर ट्रेन. पहिली झलक समोर आणल्यानंतर वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या चाचण्यांना सुरुवात झाली आहे. लवकरच पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन मार्गस्थ होणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच पहिली स्लीपर वंदे भारत मुंबईत दाखल झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून देशातील विविध भागांमध्ये स्लीपर वंदे भारत ट्रेनची चाचणी घेण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल या मार्गावर स्लीपर वंदे भारत ट्रेनची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी ठरल्याचे सांगितले जात आहे. वंदे भारत रेल्वेनंतर आता स्लीपर वंदे भारत ट्रेन कशी असेल, नवी स्लीपर वंदे भारत ट्रेन नेमकी कशी दिसते, कशी सेवा असेल, याबाबत प्रवाशांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे, असे सांगितले जात आहे.
भारताची नवी प्रिमियम स्लीपर वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज
नवीन वंदे भारत स्लीपर कोच ट्रेनचा यामध्ये ब्रेकिंग सिस्टीम, एअर सस्पेंशन, कप्लर फोर्सची चाचणी घेण्यात आली. ताशी १८० किमी वेगाने धावण्यास ही ट्रेन सक्षम आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेन राजधानी एक्स्प्रेसला रिप्लेस करणार असून, राजधानीपेक्षा अद्ययावत सुविधा, सुरक्षा नवीन स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. नवीन स्लीपर वंदे भारत ट्रेन पहिल्यांदा कुठे सुरू होणार याबाबत निश्चित स्पष्टता नसली तरी पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन दिल्ली-मुंबई किंवा दिल्ली-कोलकाता दरम्यान चालवली जाऊ शकते, असा कयास बांधला जात आहे. या ट्रेनमध्ये आरामदायी बर्थ, स्वच्छ आणि आधुनिक टॉयलेट्स, हाय स्पीड वाय-फाय, रीडिंग लाइट्स आणि हाय स्पीड मोबाईल चार्जिंग पॉइंट्स यांसारख्या सुविधा असतील. BEML ने तयार केलेल्या पहिल्या प्रोटोटाइपमध्ये एकूण १६ कोच असतील, ज्यामध्ये ११ AC3 टियर कोच, ४ AC2 टियर कोच आणि एक AC फर्स्ट क्लास कोच असतील. स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करण्यासाठी राजधानी तुलनेत १० ते १५ टक्के जास्त तिकीट दर असेल, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोणत्या मार्गावर पहिली वंदे भारत ट्रेन चालवली जाईल, याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सूतोवाच केले आहे. यासंदर्भात एक प्रस्ताव मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने रेल्वे बोर्डकडे सादर केल्याची माहिती नागपूरचे नवे नियुक्त डी. आर. एम विनायक गर्ग यांनी दिली. केवळ नागपूर नाही, तर अन्य मंडळांकडूनही स्लीपर वंदे भारत चालवण्याबाबत प्रस्ताव देण्यात आले आहेत. मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे या मार्गांवर वंदे भारत ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव दिला आहे. रेल्वे बोर्ड याचा निर्णय घेईल. परंतु, आमची इच्छा तीच असेल की, या प्रस्तावावर विचार व्हावा. स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू असून, जशी ट्रेन उपलब्ध होईल, त्या प्रमाणे रेल्वे बोर्ड निर्णय घेईल. प्रत्येकाला स्लीपर वंदे भारत आपल्याकडे यायला हवी, अशी इच्छा आहे, असे त्यांनी नमूद केले.