Join us  

आधी निरुपमच्या तिकीटाचा फैसला करा, मिलिंद देवरा यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 10:14 AM

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या तिकिटाचा आधी फैसला करा अशी आग्रही मागणी माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीकडे केली आहे.

ठळक मुद्देमुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या तिकीटाचा आधी फैसला करा अशी आग्रही मागणी माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीकडे केली आहे. गेल्या चार दिवसांपासून देवरा यांनी प्रचाराला ब्रेक दिला आहे. काँग्रेस पार्टीने देवरा यांना दक्षिण मुंबईतून तिकीट दिले आहे.

मनोहर कुंभेजकर

मुंबई - मुंबईकाँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या तिकिटाचा आधी फैसला करा अशी आग्रही मागणी माजी केंद्रीय राज्यमंत्रीमिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीकडे केली आहे. गेल्या चार दिवसांपासून देवरा यांनी प्रचाराला ब्रेक दिला आहे. काँग्रेस पार्टीने देवरा यांना दक्षिण मुंबईतून तिकीट दिले आहे. मात्र मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या तिकिटाचा आधी फैसला करा अशी आग्रही मागणी देवरा यांनी  काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली. आपला प्रचार थांबवून गेले दोन दिवस ते दिल्लीत तळ ठोकून होते.

निरुपम यांनी त्यांचा 2014 चा उत्तर मुंबई मतदार संघातून पळ काढून त्यांना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघ हवा आहे. त्यामुळे उत्तर मुंबईतून इतरांना  तिकीट द्यावे आणि मग आपल्याला उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून तिकीट मिळेल असे निरुपम यांचे मनसुबे होते. मात्र काँग्रेस पक्षश्रेठींनी निरुपम यांनी उत्तर मुंबईचे उमेदवार म्हणून अभिनेत्री शिल्पा शिंदे, अभिनेत्री आश्विनी जोशी, अभिनेता कृष्णा अभिषेक, मुंबई महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा आणि मुंबई काँग्रेसच्या चार्टर्ड अकाउंट सेलचे अध्यक्ष शेखर वैष्णव या पाच नावांना नकार दिला होता. तर प्रवीण छेडा शुक्रवारी (22 मार्च) दुपारी 12.30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत वानखेडे स्टेडियम गरवारे हाऊस येथे भाजपात होणार प्रवेश करणार असल्याची माहिती छेडा यांनीच ट्वीट करून ही माहिती दिली.

निरुपम यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसच्या नेत्यांना विश्वासात न घेता मुंबई काँग्रेस कार्यकारिणीची घोषणा करून त्यांच्या मर्जीतील 24 कार्यकर्त्यांची वर्णी लावली. तसेच जर कॅप्टनच उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघ सोडून उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत असेल, तर भाजपला मुंबई काँग्रेसकडे उत्तर मुंबईतून उमेदवारच नाही असे प्रचारात आयते कोलीत मिळेल. त्यांचा परिणाम आमच्या निवडणुकांवर होईल अशी ठाम भूमिका देवरा यांनी पक्षश्रेष्ठीकडे मांडल्याचे सूत्रांनी लोकमतला सांगितले. देवरा यांच्या भूमिकेनंतर आता पक्षश्रेष्ठी निरुपम यांच्या तिकीटाबाबत काय निर्णय घेतात याकडे देवरा व कामत गटांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :संजय निरुपमकाँग्रेसमुंबईनिवडणूक