Join us  

अजित पवारांना पहिला झटका; आमदार निलेश लंके आजच शरद पवार गटात?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 9:55 AM

आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने काही जागांवर उमेदवारांची घोषणाही केली आहे.

मुंबई - अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गटात सामिल झालेले निलेश लंके आता पुन्हा घरवापसी करत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत आज शरद पवार गटात प्रवेश करत आहेत. पुण्यातील कार्यालयात हा सोहळा होत असून शरद पवारांकडून निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनीही निलेश लंकेंना आपल्यासोबत येण्याचे आवाहन केले होते.

आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने काही जागांवर उमेदवारांची घोषणाही केली आहे. जागावाटपावरुन राजकीय पक्षांच कसरत होत असून अहमदनगरच्या राजकारणात अत्यंत रंजक घडामोडी पाहायला मिळत आहेत. भाजपा नेते आणि खासदार सुजय विखे यांच्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ सध्या केंद्रबिंदू ठरला आहे. कारण, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांचे नाव अहमदनगर दक्षिणमधील संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे. त्यातच, निलेश लंके आजच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.  

राष्ट्रवादीतील फुटीनंतर पारनेरचे आमदार निलेश लंके अजित पवार गटासोबत राहिले. मात्र, गेल्या काही दिवसांपासूनची त्यांची भूमिका पाहात ते ते कोणत्याही क्षणी शरद पवार गटात प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना जाहीरपणे आपल्यासोबत येण्याची साद घातली होती. लोकनेते लवकर निर्णय घ्या, दक्षिण नगरमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची 'तुतारी' वाजवा, अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना थेट ऑफरच दिली होती. त्यावर, लंकेंडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र, आज थेट शरद पवार गटात प्रवेश आणि त्यांची उमेदवारी जाहीर होणार असल्याचे दिसून येत आहे. 

निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी निलेश लंके यांच्या बॅनर्सवर शरद पवार यांचा फोटो दिसला होता. त्यामुळे, ते आजही मनाने शरद पवारांसोबतच असल्याची चर्चाही त्यांच्या मतदारसंघात होती. आता, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते निर्णय घेत असून विखे पाटलांसाठी व अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. 

 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारपारनेरअहमदनगर