Join us
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी मेट्रोची अग्निसुरक्षा तपासणी सुरू हाेणार, सीएमआरएस पथकाला लवकरच बोलविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 11:12 IST

सीएसएमटी, विधान भवन आणि कफ परेड या तीन मेट्रो स्थानकांच्या तपासण्या पूर्ण झाल्या आहेत. तर येत्या काही दिवसांत उर्वरित स्थानकांचीही अग्निसुरक्षा तपासणी केली जाणार आहे.

मुंबई : आरे ते कफ परेड या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवरील आचार्य अत्रे चौक ते कफ परेड स्थानकांच्या अग्नी सुरक्षा तपासणीला सुरुवात झाली आहे.  सीएसएमटी, विधान भवन आणि कफ परेड या तीन मेट्रो स्थानकांच्या तपासण्या पूर्ण झाल्या आहेत. तर येत्या काही दिवसांत उर्वरित स्थानकांचीही अग्निसुरक्षा तपासणी केली जाणार आहे.

 मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) ३३.५ किमी लांबीची मेट्रो मार्गिका उभारली जात आहे. त्यावर एकूण २७ स्थानके असतील. त्यातील आरे ते बीकेसी पहिल्या टप्प्याचा १२.६९ किमी लांबीचा मार्ग ७ ऑक्टोबर २०२४ पासून प्रवाशांच्या सेवेत आला. बीकेसी ते आचार्य अत्रे चौक स्थानक या दुसऱ्या टप्प्याच्या ९.७७ किमी लांबीच्या मार्गाचे ९ मे रोजी लोकार्पण झाले. त्यातून मेट्रो ३च्या आरे ते आचार्य अत्रे चौकदरम्यान १६ स्थानकांवर मेट्रो सेवा सुरू झाली आहे.  संपूर्ण मार्ग  सेवेत दाखल करण्याच्या अनुषंगाने एमएमआरसीने हालचाली सुरू केल्या आहेत.  

अंतिम टप्प्यातील स्थानके  कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसएमटी, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम.

प्रमाणपत्र मिळताच संपूर्ण मार्ग सेवेतएमएमआरसीने मेट्रो स्थानकांच्या अग्रिसुरक्षा चाचण्यांना सुरुवात केली आहे. या चाचण्या पूर्ण होताच सीएमआरएस पथकाला अंतिम तपासणीसाठी बोलाविले जाणार आहे. 

त्यादृष्टीने सीएमआरएस पथकाला शेवटच्या टप्प्यातील मार्गाच्या तपासणीसाठी बोलाविण्याची प्रक्रिया एमएमआरसीने सुरू केली आहे. हे सीएमआरएस प्रमाणपत्र मिळताच मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोचा संपूर्ण मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

टॅग्स :मेट्रो