आग विझवण्यासाठी धावून आला फायर रोबो; शॉपिंग सेंटरमधील आगीवर नियंत्रण, जीवितहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 03:54 IST2020-07-12T03:52:28+5:302020-07-12T03:54:23+5:30
बोरीवली पश्चिमेतील स्वामी विवेकानंद रोडवरील दुर्घटनाग्रस्त इमारत बेसमेंट अधिक तळमजला आणि वर दोन माळ्यांची आहे.

आग विझवण्यासाठी धावून आला फायर रोबो; शॉपिंग सेंटरमधील आगीवर नियंत्रण, जीवितहानी नाही
मुंबई : बोरीवली पश्चिमेकडील इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरमध्ये शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र, मोठ्या प्रमाणात पसरणाऱ्या धुराने मदतकार्यात अडथळा निर्माण केला. अखेर फायर रोबोची मदत घेण्यात आली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.
बोरीवली पश्चिमेतील स्वामी विवेकानंद रोडवरील दुर्घटनाग्रस्त इमारत बेसमेंट अधिक तळमजला आणि वर दोन माळ्यांची आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी १४ फायर इंजीन, १४ जम्बो टँकरद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पहिल्या माळ्यावर प्रचंड धूर पसरला होता. आत जाण्यासाठी जेसीबीच्या मदतीने बेसमेंटला लावलेल्या ग्रिल्स तोडण्यात आल्या. मात्र धूर वाढतच चालला होता. अखेर आग विझवण्यासाठी फायर रोबोची मदत घेण्यात आली. दुपारी पावणेतीनच्या सुमारास आग नियंत्रणात आली. या दुर्घटनेत मोबाइल, कपड्यांसह उर्वरित साहित्य जळून खाक झाले असून, सुमारे ८० ते ९० गाळ्यांचे मोठे नुकसान झाले.