Join us

Fire In Mumbai: ...तर त्या व्यक्तीचे प्राण वाचले असते, त्या चुकीवर बोट ठेवत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 13:50 IST

Fire In One Avighna Park, Mumbai: इमारतीतील कर्मचाऱ्यांनी आणीबाणीच्या प्रसंगी प्रसंगावधान दाखवले असते तर त्या व्यक्तीचे प्राण वाचले असते, असे विधान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

मुंबई - मुंबईतील करीरोड परिसरात असलेल्या वन अविघ्न पार्क या ६० मजली इमारतीत १९ व्या मजल्यावर भीषण आग लागली असून, ही आग इतर मजल्यांवर पसरली आहे. या आग्निकांडादरम्यान जीव वाचवण्याचा प्रयत्नात एका व्यक्तीचा एका मजल्यावर खाली पडून मृत्यू झाला आहे. मात्र इमारतीतील कर्मचाऱ्यांनी आणीबाणीच्या प्रसंगी प्रसंगावधान दाखवले असते तर त्या व्यक्तीचे प्राण वाचले असते, असे विधान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

याबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या की, अविघ्न पार्क ही ६० मजली इमारत आहे. आग लागल्यानंतर सर्वांची पळापळ झाली आहे. अग्निशमन दल, महापालिकेचे कर्मचारी आलेले आहे. या परिसरातील आमदार इथे उपस्थित आहेत. शिवसेना शाखेच्या रुग्णवाहिकाही तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

आग लागल्यानंतर एक व्यक्ती १५ मिनिटे इमारतीच्या बाहेरून लटकत होता. वन अविघ्न पार्क ही उच्चभ्रू सोसायटी आहे. इथे सुमारे २०० हून अधिक सिक्युरिटी गार्ड आणि कर्मचारी काम करतात. मात्र हे सर्व अप्रशिक्षित कर्मचारी असल्याचे मला वाटते. त्यांनी योग्य समयसूचकता दाखवली असती तर त्या व्यक्तीचा जीव वाचला असता. तो व्यक्ती लटकत असताना त्याला वाचवण्यासाठीचं आवश्यक प्रशिक्षण या कर्मचाऱ्यांना मिळालेलं मला दिसलं नाही. तो लटकत असताना खाली गाद्या घातल्या असत्या, चादरी लावल्या असत्या तर त्याला एवढी गंभीर दुखापत झाली नसती, असे महापौरांनी सांगितले.

दरम्यान, वन अविघ्य पार्कला आग लागल्यानंतर वर लटकत असलेली व्यक्ती खाली पडून तिला गंभीर दुखापत झाली. या व्यक्तीला रुग्णालयात नेले असता तिथे डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केले. अरुण तिवारी असे या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. 

टॅग्स :आगमुंबईकिशोरी पेडणेकर