बांगूरनगरमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून अपंग भावाला जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 05:10 IST2017-12-28T05:08:48+5:302017-12-28T05:10:04+5:30

मुंबई : संपत्तीच्या वादातून अपंग असलेल्या चुलत भावाच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळण्याची घटना गोरेगाव बांगूरनगरातील आदिवासी पाड्यात बुधवारी सकाळी घडली.

A fire broke out in the name of property in Bangurnagar | बांगूरनगरमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून अपंग भावाला जाळले

बांगूरनगरमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून अपंग भावाला जाळले

मुंबई : संपत्तीच्या वादातून अपंग असलेल्या चुलत भावाच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळण्याची घटना गोरेगाव बांगूरनगरातील आदिवासी पाड्यात बुधवारी सकाळी घडली. सुनील भिवा कातेले (३०) असे या मृत पावलेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी संतोष लाडक्या कातेले (४०) याला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. अविवाहित असलेल्या सुनीलला मारून त्याची खोली बळकाविण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी करीत कातेलेवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
आदिवासी पाड्यातील आदर्श सोसायटीत कातेले बंधू राहात असून, त्यांच्यात मालमत्तेच्या कारणावरून वाद आहे. अपंग व अविवाहित असलेला सुनील हा तळमजल्यावर राहात असून, संतोष हा नेहमी त्याच्याशी भांडण करीत असे. बुधवारी सकाळी पुन्हा त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर, संतोषने सुनीलला मारहाण करीत, त्याच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. त्यानंतर, खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करून दारात उभा राहिला. सुनीलच्या आरडाओरडीमुळे हा प्रकार लक्षात आल्यानंतर, शेजाºयांनी तिकडे धाव घेत पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले.
सुनीलला बाहेर काढून सिद्धार्थ रुग्णालयात दाखल केले. गोरेगाव पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत, संतोषला अटक केली. सुनील ९५ टक्के भाजला होता. प्रकृती गंभीर असल्याने, त्याला नायर रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा सायंकाळी मृत्यू झाला.

Web Title: A fire broke out in the name of property in Bangurnagar

टॅग्स :fireआग