Join us  

पुण्यातील मुंढव्यात एकाच रात्रीत गोडाऊन अन् कार सेंटरला आग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 11:09 AM

याबाबत स्टेशन अधिकारी विजय भिलारे यांनी सांगितले की, आम्ही पोहचलो, त्यावेळी गोदामाने चारी बाजूने पेट घेतला होता़ तातडीने चारही बाजूने पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला.

ठळक मुद्देयाबाबत स्टेशन अधिकारी विजय भिलारे यांनी सांगितले की, आम्ही पोहचलो, त्यावेळी गोदामाने चारी बाजूने पेट घेतला होता़ तातडीने चारही बाजूने पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला.

पुणे : मुंढवा स्मशानभूमी जवळील फर्निचरचे गोदाम आणि मुंढवा पोलीस चौकीनजीक मारुती सुझूकी सेंटर अशा दोन ठिकाणी एकाच रात्रीत आग लागण्याची घटना घडली. मुंढवा स्मशानभूमीजवळ जुन्या फर्निचरच्या गोदामाला मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. सुमारे २०० बाय २०० जागेत हे गोदाम उभारण्यात आले आहे. कोंद्रे यांच्या मालकीच्या जागेवर राम वर्मा यांचे हे गोदाम आहे. ते जुन्या फर्निचरच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. फर्निचर, लाकडी साहित्य असल्याने ही आग वेगाने भडकली. अग्निशामन दलाच्या ५ गाड्या आणि ३ टँकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. 

याबाबत स्टेशन अधिकारी विजय भिलारे यांनी सांगितले की, आम्ही पोहचलो, त्यावेळी गोदामाने चारी बाजूने पेट घेतला होता़ तातडीने चारही बाजूने पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला. या आगीत गोदामातील सर्व फर्निचर जळून खाक झाले. आग विझविल्यानंतर कुलिंगचे काम सकाळी ९ वाजल्यानंतरही सुरु होते. या आगीपाठोपाठ मुंढवा येथे आगीची दुसरी मोठी घटना घडली. मुंढवा पोलीस चौकीजवळील महालक्ष्मी मोटिव्ह हे नितीन सातव यांचे मारुती सुझुकी कार सेंटर आहे. या सेंटरला पहाटे २ वाजून ३४ मिनिटांनी आग लागली. या सेंटरला लागलेली आग भीषण होती. या आगीत सेंटरमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. ४० हजार स्क्वेअर फुट जागेपैकी निम्म्या जागेवर आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याबरोबर फोमचा वापर करुन ही आग आटोक्यात आणली. आग विझविण्यासाठी आत जाण्यासाठी जागा मिळत नसल्याने जेसीबीच्या सहाय्याने कडेची भिंत पाडल्यानंतर जोरदार मारा करुन ही आग विझविण्यात आली. 

आगीत २ कार तसेच विक्रीसाठी ठेवलेल्या नवीन ३ ते ४ कारचे नुकसान झाले. सीसीटीव्ही, फर्निचर व अन्य साहित्य जळून खाक झाले. या ठिकाणी आॅईलने भरलेले २०० लिटरचे दोन बॅरेल होते. सुदैवाने या बॅरेलला आगीची झळ पोहचली नाही. नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. अग्निशामन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे, सहायक अग्निशमन अधिकारी रमेश गांगड, अग्निशमन अधिकारी प्रकाश गोरे व अन्य कर्मचार्‍यांनी काही तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणली.  सकाळी उशिरापर्यंत कुलिंग करण्याचे काम सुरु होते.  सुदैवाने या दोन्ही आगीत कोणीही जखमी झाले नाही. 

टॅग्स :पुणेआग