Join us  

सरकारी, खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 5:26 AM

पालिका प्रशासनाचा निर्णय : १५ दिवसांत करणार झाडाझडती पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मुंबईतील सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांची झाडाझडती सुरू केली आहे. या रुग्णालयांचे फायर ऑडिट १५ दिवसांमध्ये पूर्ण केले जाईल. मुंबईत १४०० खासगी नर्सिंग होम्स, पालिकेची पाच विशेष रुग्णालये, तीन प्रमुख, १६ उपनगरीय रुग्णालये, २८ प्रसूतिगृहे, चार शासकीय रुग्णालये आणि पाच कामगार रुग्णालयांचे ऑडिट केले जाईल.

गेल्या वर्षी गुजरातमधील कोविड रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर महापालिकेने आपल्या सर्व रुग्णालयांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोविड काळात ऑडिटचे काम रेंगाळले हाेते. आता भंडारा येथील दुर्घटनेनंतर पालिकेने सोमवारपासून सर्व रुग्णालयांचे ऑडिट सुरू केले आहे. कुर्ला विभागात ६२ खासगी नर्सिंग होम्स आहेत. यापैकी चार रुग्णालयांचे ऑडिट करण्यात आले आहे. तर लोकसंख्या अधिक असलेल्या अंधेरी पश्चिमेतील १०७ रुग्णालयांचे ऑडिट करण्यास सुरुवात झाली आहे. अग्निरोधक तसेच पाण्याचा शिडकावा करणारी यंत्रणा कार्यान्वित आहे का? आपत्तीकाळात बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा आहे का? आदी बाबींची तपासणी करण्यात येत आहे. आगीच्या दुर्घटनेत बचावाचे प्रशिक्षण दरवर्षी आपल्या कर्मचाऱ्यांना देण्याची जबाबदारी रुग्णालयांवर आहे.

यापूर्वी घडलेल्या आगीच्या काही घटनाn २९ ऑक्टोबर २०२० - दहिसर, कांदरपाडा परिसरात कोविड रुग्णालयात अतिदक्षता उपचार केंद्रात एका रुग्णाच्या शेजारी असलेल्या वैद्यकीय उपकरणाला अचानक आग लागली. या वेळी प्रसंगावधान राखत तेथे उपस्थित परिचारिकांसह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली.n १२ ऑक्टोबर २०२० - मुलुंड येथील अपेक्स रुग्णालयात जनरेटरला लागलेल्या आगीत रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित झाला होता. या रुग्णालयातील ४० रुग्णांना इतर रुग्णालयांत दाखल करताना एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.n १७ डिसेंबर २०१८ - अंधेरीतील कामगार रुग्णालयात भीषण आगीत आठ लोकांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :आगमुंबईभंडारा आग