समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत सोने-चांदीचा शोध!
By मनोहर कुंभेजकर | Updated: August 8, 2025 13:52 IST2025-08-08T13:52:28+5:302025-08-08T13:52:44+5:30
गेल्या तीन महिन्यांत या गाळकाम करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सोने-चांदी शोधण्यासाठी ते समुद्रातील वाळूचा उपसा करतात.

समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत सोने-चांदीचा शोध!
मनोहर कुंभेजकर -
मुंबई : जुहू चौपाटी म्हणजे फिरण्याचे हक्काचे ठिकाण; पण सध्या येथे कुटुंबासह आलेले अनेकजण गुडघाभर पाण्यात उतरून छोट्या गोल जाळ्यांत वाळूमिश्रित पाणी गाळत असल्याचे पाहायला मिळत आहे. तलासरी, उंबरगाव, सुरतसह परराज्यांतून आलेल्या या कुटुंबीयांना तीन तोळे सोने सापडल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या तीन महिन्यांत या गाळकाम करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सोने-चांदी शोधण्यासाठी ते समुद्रातील वाळूचा उपसा करतात. त्यामुळे समुद्रात अनेक ठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. गेल्या आठवड्यात एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला होता, त्यालाही हे खड्डेच कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून प्रकार सुरू
याबाबत पालिकेचे निवृत्त जीवरक्षक मनोहर शेट्टी यांनी सांगितले की, पावसाळ्यात दरवर्षी २०० ते ३०० नागरिक समुद्रातील वाळूत सोने-चांदी शोधण्यासाठी येतात. यंदाही गेले तीन महिने हा प्रकार सुरू आहे. या प्रकारामुळे पाण्याखाली मोठे खड्डे पडून पावसाळ्यात डीप करंट निर्माण होत आहे. त्यातूनच बुडण्याच्या घटना घडत आहेत.
याबाबत जुहू पोलिस आणि संबंधित यंत्रणांकडे पत्रव्यवहार व तक्रारी केल्या आहेत. मात्र कोणीच गंभीर दखल घेतलेली नाही. पालिका प्रशासन, पोलिस आणि महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने समुद्रात खड्डे करण्यापासून नागरिकांना रोखले नाही, तर पर्यटक पसंतीचे मुंबईचे समुद्रकिनारे धोकादायक होऊ लागतील, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सलग दोन दिवसांत दोन दुर्घटना
जुहू बीचवर लायन्स क्लबसमोर सलग दोन दिवस बुडण्याच्या घटना घडल्या आहेत. खड्ड्यात डीप करंट निर्माण होत असल्यानेच हा प्रकार घडत असल्याचा अंदाज पालिकेचे जीवरक्षक सोहिल मुलाणी यांनी वर्तवला.
मात्र अशा धोकादायक परिस्थितीतही दृष्टी लाइफ गार्ड कंपनीचे जीवरक्षक संतोष तांडेल, अक्षय मेहेर, अनिल निआई, समीर पागधरे, बबन गवारी, राजेश म्हात्रे, आविष्कार वैती यांनी गेल्या दोन दिवसांत बुडणाऱ्या १२ तरुणांना वाचवले आहे, असेही त्यांनी सांगितले.