finance minister nirmala sitharaman faces agitation from pmc bank depositors in mumbai | पीएमसी खातेधारकांचा अर्थमंत्र्यांना घेराव; भाजपा कार्यालयाबाहेर आंदोलन
पीएमसी खातेधारकांचा अर्थमंत्र्यांना घेराव; भाजपा कार्यालयाबाहेर आंदोलन

मुंबई: पंजाब महाराष्ट्र बँकेच्या खातेधारकांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना घेराव घेतला. आर्थिक अनियमितता असल्यानं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पीएमसी बँकेवर निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध उठवण्याच्या मागणीसाठी बँकेच्या खातेधारकांनी अर्थमंत्र्यांसमोर आंदोलन केलं. मुंबईत आलेल्या निर्मला सीतारामन भाजपाच्या नरिमन पॉईंटमधील कार्यालयात जात असताना त्यांना पीएमसी बँकेच्या ग्राहकांच्या रोषाचा सामना करावा लागला. पीएमसी बँकेवर लादण्यात आलेल्या निर्बंधामुळे अडचणीत आलेल्या ग्राहकांशी सीतारामन यांनी चर्चा केली. यानंतर त्यांनी पत्रकारांना संबोधित केलं. आज संध्याकाळी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्याशी बोलून ग्राहकांना होणाऱ्या त्रासाची माहिती त्यांना देईन, असं सीतारामन म्हणाल्या. ग्राहकांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी त्यांना विनंती करेन, असंदेखील त्यांनी पुढे सांगितलं. पंजाब महाराष्ट्र बँकेतील आर्थिक अनियमिततेप्रकरणी दिल्लीतही आंदोलन झालं. बँकेतील अनियमिततेला जबाबदार असलेल्या आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी खातेधारकांनी केली. या प्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष आणि एचडीआयएलच्या दोन संचालकांच्या पोलीस कोठडीत १४ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. पीएमसीतील एकूण आर्थिक अपहार ४३५५ कोटी रुपयांचा आहे.

Web Title: finance minister nirmala sitharaman faces agitation from pmc bank depositors in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.