मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. तो सिद्धीस नेण्यासाठी महाराष्ट्र अव्वल दर्जाची कामगिरी करेल. सरकार स्थापनेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'महाराष्ट्र आता थांबणार नाही,' असे म्हटले होते. त्यामुळे उद्योग, पायाभूत सुविधा, कृषी व संलग्न क्षेत्रे, सामाजिक आणि इतर क्षेत्रांच्या विकासासाठी महत्त्वाच्या तरतुदी करणारा हा अर्थसंकल्प आहे. 'महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही' अशा काव्यपंक्तीचा आधार घेत वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. त्यांच्या विविध विषयांवरील कवितांना सदस्यांनी बाके वाजवून दाद दिली.
'आम्हावरी खिळले डोळे, उद्याच्या पिढ्यांचे आज स्वप्न बघतो आम्ही, उद्याच्या दिसांचे...' अशा शब्दात नवीन पिढीला रोजगाराबाबत आश्वस्त केले.
'काळी माती ज्याची शान, तिच्यात राबे विसरुनी भान! पोशिंदा हा आहे आपला, कृतज्ञतेने ठेवू जाण! देऊ योजना अशा तया की राहील त्याचे हिरवे रान !!' असे सांगत शेतकऱ्यांबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
अभिजात मराठी सप्ताह केंद्र सरकारने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळे यापुढे राज्यात दरवर्षी ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून, तर ३ ते ९ ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. यावेळी त्यांनी या काव्यपंक्ती सभागृहात म्हटल्या.
'भावफुलांना पायी उधळून, आयुष्याचा कापूर जाळून तुझे सारखे करीन पूजन,गीत तुझे मी आई गाईन शब्दोशब्दी अमृत ओतून.'
...म्हणून आम्ही पुन्हा आलो' 'लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो, केली विकासाची कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो... पुन्हा आलो...' असे म्हणत अजित पवार यांनी लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्याचे विरोधकांना सुनावले.