Join us  

अखेर रणजितसिंह मोहिते पाटलांचा राजीनामा आला, जयंत पाटलांकडे सोपवला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 9:30 PM

रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले, १९९९ साली अशीच बैठक घेतली होती. त्यानंतर ही बैठक आहे. शेती, पाणी व कारखानदारी यासाठी सहकार महर्षिंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहितेपाटील यांचे चिरंजीव माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकला आहे. याबाबत पक्षाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आपला राजीनामाही सोपवला. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदांचा राजीनामा देत आहे, तरी माझा राजीनामा स्विकारावा, अशी विनंती रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केली आहे. दरम्यान, अकलूज येथे दुपारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपाच प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे.   

सोलापूर जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण असलेले कृष्णा भीमा स्थिरीकरण, रस्त्यांचे चौपदरीकरण, पंढरपूर-लोणंद रेल्वे मार्गासह साखर कारखानदारी यासारखे प्रश्न सोडविण्याची ताकद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्यात असल्याचे उदगार माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी अकलूज येथील मेळाव्यात काढले. त्यावेळी भाजपाकडून माढा लोकसभेसाठी उमेदवारी मिळणार की नाही याबाबत मात्र ते काहीच बोलले नाही़ मात्र माझ्या उमेदवारीचा निर्णय भाजपच घेईल असेही ते रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अपमान होत असल्याने मोहिते-पाटील यांनी उद्या मुंबईत भाजपात प्रवेश करीत असल्याचा निर्णय घेतला. अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर मोहिते-पाटील समर्थकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली असून, माढा मतदारसंघात पक्षाची स्थिती आणखी बिकट झाली आहे. या बैठकीस राष्टÑवादीचे मुख्य नेते उपस्थित नसले तरी करमाळ्याचे शिवसेनेचे आमदार नारायण पाटील हे उपस्थित होते. 

या बैठकीस खा. विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील,  जयसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील, राष्टÑवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील, मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा अरूणा माळी, करमाळा बाजार समिती सभापती बंडगर, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, शफी इनामदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील, राष्टÑवादी काँग्रेसचे माळशिरस तालुकाध्यक्ष संग्रामसिंह जहागीरदार, नागनाथ कदम, प्रा. रवींद्र ननवरे, संतोष नेहतराव (पंढरपूर) यांच्यासह मोहिते-पाटील समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले, १९९९ साली अशीच बैठक घेतली होती. त्यानंतर ही बैठक आहे. शेती, पाणी व कारखानदारी यासाठी सहकार महर्षिंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सत्तेचा वापर सर्वसामान्यांसाठी झाला पाहिजे म्हणून वसंतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिते-पाटील यांनी समाजकारण केले. गेल्या दहा वर्षांपासून आमची चेष्टा होत आहे. कृष्णा भीमा-स्थिरीकरण हे पक्षांतराचे कारण आहे. भाजपाच्या नेत्यांना या योजनेची माहिती दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शविली. गावे ओसाड होणार नाही, याची ताकद फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, गडकरी आणि फडणवीस यांच्यात आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत. उद्या सकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे रणजितसिंह म्हणाले. याला विजयसिंह मोहिते-पाटील यांची सहमती असल्याचेही रणजितसिंह यांनी सांगितले. जिल्हा परिषद सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी आपण अद्याप राष्ट्रवादीचे सभासद नाहीत. आपण दादांबरोबर आहोत. सर्व कार्यकर्त्यांचे मत म्हणजे विजयदादा असल्याचे त्यांनी सांगितले. सहकार महर्षि कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी गेली 67 वर्षे मोहिते-पाटील यांनी केवळ समाजकारण करीत असल्याचे सांगितले.

करमाळा बाजार समिती सभापती बंडगर यांनी संजय शिंदे यांच्यावर टीका करताना दोन दोन तालुक्यात काम करणारी बांडगुळे असल्याचे सांगितले. सविताराजे भोसले यांनी विजयदादा भोळे आहेत. इतके दिवस मानहानी सहन केल्याचे सांगितले. माढा लोकसभा मतदारसंघात सर्जिकल स्ट्राईक करावा असे मत संतोष देवकते (सांगोला) यांनी व्यक्त केले.

अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. वजीर शेख यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांच्यावर तोफ डागली. साळुंखे बैठकीत आमचे नावही घेत नव्हते. आमचा सासुरवास संपला. आपण अल्पसंख्याक सेलचा राजीनामा देत असल्याची त्यांनी घोषणा केली. 

टॅग्स :लोकसभा निवडणूकजयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसराजीनामा