Join us

ताप जातोय, मात्र का बरा होत नाही खोकला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 10:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शहरात सध्या व्हायरल इन्फेक्शनने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर ग्रासले आहे. हा ताप तीन-चार दिवसांत उतरतो, ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शहरात सध्या व्हायरल इन्फेक्शनने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर ग्रासले आहे. हा ताप तीन-चार दिवसांत उतरतो, मात्र खोकल्याचा त्रास दीर्घकाळ टिकून राहत असल्याने अनेक जण वैतागले आहेत. हा साधा ताप असला तरी यामध्ये फुप्फुसांवर परिणाम होत असल्याने खोकला लवकर जात नसल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून शहरातील क्लिनिक आणि रुग्णालयांत ताप, सर्दी, अंगदुखी आणि सततच्या खोकल्याने त्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे ताप बरा होऊनही खोकल्याचा त्रास दोन ते तीन आठवड्यांपर्यंत सुरू राहतो आहे. सध्या पावसाळ्याचे वातावरण आणि अचानक बदलणारे तापमान यामुळे संसर्गाचा धोका वाढतो आहे. परिणामी, लहान मुले, वृद्ध नागरिक, तसेच प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांना त्याचा फटका सर्वाधिक बसतो आहेत. अनेक रुग्ण तापानंतरही सततचा थकवा, घशातील कोरडेपणा, खवखव आणि खोकल्याची तक्रार करताना दिसत आहेत.

दरवर्षी या वातावरणात व्हायरलचे रुग्ण वाढत असतात. त्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांना याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, स्वच्छता पाळणे आणि लक्षणे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. सध्या परिस्थिती गंभीर नसली तरी योग्य काळजी घेतली  पाहिजे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

घरगुती उपचारांऐवजी डॉक्टरांकडेच जावेआरोग्यतज्ज्ञांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, लक्षणे दिसल्यास घरी औषधोपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अनेक जण सहजपणे मेडिकल दुकानामध्ये मिळणारी औषधी घेऊन घरीच उपचार करतात. त्यामुळे काही रुग्णांची तब्येत अधिकच बिघडते. गरज नसताना अँटिबायोटिक घेणे टाळावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

व्हायरल इन्फेक्शनमुळे काही वेळा फुप्फुसांच्या आतील रचनेवर गंभीर दुष्परिणाम होतात. त्यामुळे ताप लवकर जाऊनही खोकल्याचा त्रास अनेक दिवस राहतो. ही व्याधी बरी होण्यासाठी काही काळ जातो. कालांतराने खोकलासुद्धा कमी होतो. मात्र, ताप आणि खोकला दोन्हींसाठी योग्य डॉक्टरांकडून निदान करून घेणे गरजेचे आहे.  नागरिकांनी  घाबरण्याची अजिबात गरज नाही.  योग्य उपचार आणि विश्रांती घेतल्यास आजार बरा होण्यास मदत होते. डॉ. हर्षद लिमये, संसर्गजन्य विकारतज्ज्ञ, मॅक्स नानावटी हॉस्पिटल

टॅग्स :आरोग्य