Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोविड सेंटर संचालकांवर एफआयआर दाखल करा; भाजप आमदाराची आयुक्तांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 00:46 IST

आशा कॅन्सर ट्रस्ट व रिसर्च सेंटर या संस्थेला मुलुंड येथील ६०० खाटांच्या कोविड उपचार केंद्राला आवश्यक कर्मचारी वर्ग पुरविण्याचे कंत्राट जुलैमध्ये देण्यात आले आहे.

मुंबई : मुलुंड येथे कोविडसाठी उभारण्यात आलेल्या जंबो उपचार केंद्रातील निष्काळजीपणा,  हलगर्जीपणाबाबत महापालिकेच्या यंत्रणांनी हे केंद्र चालविणाऱ्या आशा कॅन्सर ट्रस्ट व रिसर्च सेंटरवर ठपका ठेवला आहे. त्यामुळे आशा कॅन्सर ट्रस्टबरोबरच्या कराराचे नूतनीकरण करू नये, अशी मागणी भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. तसेच, या केंद्रातील मृत्यूंबाबत ट्रस्टचे संचालक, केंद्रातील कर्मचारी व या ट्रस्टला पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.

आशा कॅन्सर ट्रस्ट व रिसर्च सेंटर या संस्थेला मुलुंड येथील ६०० खाटांच्या कोविड उपचार केंद्राला आवश्यक कर्मचारी वर्ग पुरविण्याचे कंत्राट जुलैमध्ये देण्यात आले आहे. यासाठी या संस्थेला करारात काही अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र या अटींचे पालन या संस्थेकडून होत नसल्याचे महापालिकेच्या संबंधित यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे. उपचार केंद्रात डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ व अन्य कर्मचाऱ्यांची संख्या आवश्यकतेपेक्षा ३० ते ५० टक्के कमी आहे. तसेच ट्रस्टने नियुक्त केलेल्या परिचारिका पुरेशा प्रशिक्षित नाहीत, असेही आढळून आले आहे. रुग्णांना घरी केव्हा सोडायचे याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात नाही. रुग्ण बरा झाला असला तरी त्याला उपचार केंद्रातच थांबवून ठेवले जाते. पालिकेच्या सहायक आयुक्तांनी या केंद्राला नोटीसही पाठविल्याचे कोटेचा यांनी सांगितले.  रेमेडिसिव्हर इंजेक्शन देण्याबाबत मनमानी कारभार, प्राणवायूचा पुरवठा केला नसताना कागदोपत्री दिल्याची नोंद करणे, असे अनेक प्रकार या केंद्रात आढळून आले आहेत. त्यामुळे या केंद्रात झालेल्या मृत्यूंबद्दल ट्रस्टचे संचालक, कर्मचारी व या ट्रस्टला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध  अहवाल दाखल करावा, अशी मागणी कोटेचा यांनी केली.

टॅग्स :भाजपामुंबई महानगरपालिकाकोरोना वायरस बातम्या