Join us  

Sanjay Raut : गद्दारहृदयसम्राट एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल करा; दळवींच्या अटकेनं संजय राऊत भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 10:42 AM

File a case against CM Eknath Shinde; Sanjay Raut was enraged by the arrest of Dalvi शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून गद्दारहृदयसम्राट मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्री जे प्रचाराला बाहेर फिरतायेत त्यावरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार आहे असा आरोप संजय राऊतांनी केली.

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जाहीर सभेत अपशब्द वापरल्यामुळे ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे भांडुप परिसरात वातावरण चांगलेच तापले आहे. खासदार संजय राऊत, आमदार सुनील राऊत हेदेखील भांडुप पोलीस स्टेशनला पोहचले आहेत. याठिकाणी ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी पाहता इथं मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांकडून येथे सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 

यावेळी संजय राऊत म्हणाले की, मुंबईचे माजी महापौर, शिवसेनेचे उपनेते दत्ता दळवी यांना घरात घुसून अटक केली. एखाद्या ३०२, ३०७ गुन्ह्यासारखे आरोपी कुठे पळून जाणार आहे अशाप्रकारे पोलिसांचा फौजफाटा घेऊन अटक केली. दळवी यांचा गुन्हा काय तर त्यांनी लोकांच्या जनभावना भांडुपच्या मेळाव्यात व्यक्त केल्या. जे गद्दारहृदयसम्राट आहे ते स्वत:ला हिंदुहृदयसम्राट म्हणवून घेतायेत. त्यावर तमाम हिंदू आणि जनतेचा आक्षेप आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. कारण ते वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरेंची उपाधी लावून घेतायेत. जर आनंद दिघे असते तर या गद्दारांना चाबकानं फोडून काढले असते. धर्मवीर आनंद दिघेंच्या तोंडी तो शब्द आहे. चित्रपटातील हा शब्द सेन्सॉरनं कापला नाही. जर तो आक्षेपार्ह असेल तर चित्रपटाचे निर्माते, कलाकार यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही असा सवाल त्यांनी विचारला. 

तसेच नारायण तातू राणे, अब्दुल सत्तार यांनी सभेत शिवीगाळ केली त्यांना अटक नाही, गुन्हा नाही. पण दत्ता दळवी यांनी लोकभावना व्यक्त केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून गद्दारहृदयसम्राट मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्री जे प्रचाराला बाहेर फिरतायेत त्यावरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार आहे. दत्ता दळवी यांनी केलेल्या विधानाचा आम्ही जाहीर समर्थन करतो. सरकार नालायक असेल तर नालायकच बोलणार. देशात आणीबाणी लागलीय का? नालायक हा असंसदीय शब्द नाही असंही राऊतांनी स्पष्ट केले. 

कार्यकर्त्यांची संतप्त भूमिका

यावेळी संतप्त कार्यकर्ते म्हणाले की, सत्ता असल्याने त्यांच्या लोकांना वेगळा न्याय आणि आमच्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना दुसरा न्याय ही कुठली पद्धत आहे? सत्तेचा वापर करून शिवसैनिकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. दत्ता दळवींनी कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले नाही.आमचा कोकणवासियांचा मेळावा होता. तिथे दत्ता दळवी मार्गदर्शन करत होते. पण हे मार्गदर्शन विरोधकांना खुपले. मुख्यमंत्र्यांविरोधात कुठलेही अपशब्द आणि गालबोट लागेल असे विधान केले नाही. पण या सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आहे. म्हणून हे सरकार आमचे प्रमुख नेते असतील त्यांना दाबण्यासाठी हे दडपशाहीचे राजकारण करत असतील तर ते शिवसैनिक सहन करणार नाही. 

काय आहे प्रकरण?भांडुपमध्ये शिवसेना उबाठा गटाकडून कोकणवासियांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. तिथे दत्ता दळवी यांनी राजस्थानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हिंदुहृदयसम्राट उल्लेख केलेल्या बॅनरचा समाचार घेतला. त्यावेळी दत्ता दळवी यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा शिंदे गटाचा आरोप आहे. यावरून तक्रारीची दखल घेत आज सकाळी पोलिसांनी दत्ता दळवी यांना अटक केली. 

टॅग्स :संजय राऊतएकनाथ शिंदेशिवसेना