Mumbai Local Women Fight: गेल्या काही दिवसांपासून मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेन गर्दीमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथे धावत्या लोकलमधून खाली पडल्याने पाच प्रवाशांना जीव गमवावा लागला. त्यानंतरही काही विचित्र घटना समोर येत आहेत. मुंबई लोकलमध्ये धक्काबुक्कीनंतर वादावादी झाल्याचे पाहायला मिळत होतं. मात्र पश्चिम रेल्वेवरील एका लोकलमध्ये महिलांच्या डब्यातील हाणामारीचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. संध्याकाळच्या सुमारास झालेल्या या घटनेत महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारातील एका महिलेच्या डोक्याला दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेतील ही महिलेला लोकलच्या दारावरच भांडत असल्याने इतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं.
पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट-विरार या महिला विशेष लोकल ट्रेनमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. १७ जून रोजी घडलेल्या या घटनेत हाणामारीच्या दरम्यान एका महिलेच्या डोक्याला दुखापत झाली. धावत्या लोकलमध्ये दारावरच हा सगळा प्रकार सुरु असल्याने इतर महिला प्रवासी घाबरल्या होत्या.
नेमकं काय घडलं?
चर्चगेटवरुन सुटलेली महिला विशेष लोकल अंधेरी स्थानकात आली असता ट्रेनमध्ये चढणाऱ्या महिलेचा दारावर उभ्या राहिलेल्या महिला प्रवाशाला धक्का लागला. याच कारणावरुन दोघांमध्ये जोरदार वाद सुरु झाला. हा वाद इतका वाढला की दोघांमध्ये हाणामारी सुरु झाली. दोन्ही महिलांना एकमेकींचे केस ओढून मारहाण सुरु केली. दारावर उभ्या असलेल्या तरुणीने दुसऱ्या महिलेच्या डोक्यात मोबाईलने मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये महिलेच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं. तरीही ती थांबली नाही. त्यानंतर महिलांना दोघांनाही बाजूला केलं.
दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून काही महिला प्रवाशांनी दार लावून घेतले. प्रत्यक्षदर्शींच्या नुसार मारहाण करणाऱ्या महिलेने दुसऱ्या महिलेला दाराच्या बाहेरही ढकल्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढील स्थानकावर दोन्ही महिलांना उतरवण्यात आलं.