सोसायटीत पाण्याचा टँकर न मागविल्याने हाणामारी; सचिवाला मारहाण; ऐन दिवाळीत पाणीटंचाई
By मनोहर कुंभेजकर | Updated: October 17, 2025 09:44 IST2025-10-17T09:43:36+5:302025-10-17T09:44:02+5:30
पाण्याविना दिवाळीत पहिली अंघोळ कशी करायची? दिवाळी कशी साजरी करायची, असा सवाल रहिवाशांनी केला.

सोसायटीत पाण्याचा टँकर न मागविल्याने हाणामारी; सचिवाला मारहाण; ऐन दिवाळीत पाणीटंचाई
- मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ऐन दिवाळीत गोरेगाव पूर्व येथील प्रभाग ५२ मधील गोकुळधाम, नवभारत सोसायटी, साईबाबा कॉम्प्लेक्स, धीरज व्हॅली, बंगाली कंपाउंड, कन्या पाडा, ओबेरॉय वूड, आरे या भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. बंगाली कंपाउंडमध्ये सोसायटीच्या सचिवांनी पाण्याचा ट्रँकर न मागवल्याने सभासद आणि सचिवांमध्ये रविवारी हाणामारी झाली. त्याबाबत दिंडाेशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याचे सोसायटीच्या सभासदांनी दिली.
येथील इमारतींमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. पाण्याविना दिवाळीत पहिली अंघोळ कशी करायची? दिवाळी कशी साजरी करायची, असा सवाल रहिवाशांनी केला. गेला महिनाभर आम्हाला एकूण पाणीपुरवठ्याच्या ४० टक्केच पाणी येते. बंगाली कंपाउंडमध्ये ९५ सदनिका आहेत. रोज ३ हजार ५०० रुपये खर्च करून ट्रँकर मागवणे आम्हाला कसे परवडणार, असा सवाल येथील येथील रहिवासी दीपक परब यांनी केला.
गोरेगाव पूर्व भागात पाणीबाणी...
गाेरेगाव परिसरातील साईबाबा कॉम्प्लेक्समध्ये २० सोसायट्या आहेत. आमच्या सदनगिरी सोसायटीत ८४ सदनिकांना गुरुवारी एक थेंबही पाणी मिळाले नाही.
हीच परिस्थिती येथील इतर सोसायटी आणि परिसराची आहे, अशी माहिती रहिवासी एडवर्ड डिसोझा यांनी दिली.
पी-दक्षिण विभाग कार्यालयावर बादली मोर्चा काढणार
पाणी प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आणि महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार, २० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पी-दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयावर बादली मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा प्रभाग क्रमांक ५२चे उद्धवसेनेचे शाखाप्रमुख संदीप गाढवे यांनी दिला आहे.