मुंबई - पश्चिम रेल्वेकडून विरार-अहमदाबाद दरम्यानच्या मार्गावर रेल्वे रुळांवर जनावरे व इतर अडथळे येण्याच्या घटना रोखण्यासाठी तब्बल ३३७ किलोमीटर अंतरावर स्टीलच्या पट्ट्यांचे मजबूत कुंपण उभारण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ११९ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून रेल्वे सुरक्षेसह गाड्यांच्या वेळापत्रकावर होणारा परिणाम कमी करण्याचा उद्देश असल्याचे अधिकारी म्हणाले.
विरार स्टेशनपुढे रुळांलगत जनावरे चरतात. अनेकदा अनावधानाने ही जनावरे रुळांवर येऊन अपघात घडतात. अचानक ब्रेक लावावे लागतात. परिणामी प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येते. तसेच एक्स्प्रेस रखडून लोकलच्या वेळापत्रकावरही परिणाम होतो. त्यामुळे पश्चिम रेल्वेने रुळांलगत कुंपण उभारण्यास सुरुवात केली आहे. सुमारे ३०० किमी भागातील काम पूर्ण झाले असून उर्वरित ३० किमी अंतरावर कुंपण उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
असे आहे कुंपण ? रुळांलगत उभारण्यात आलेले कुंपण गॅल्वनाइज्ड स्टेनलेस स्टीलपासून तयार करण्यात आले आहे. त्यामुळे त्याला गंज लागत नाही आणि दीर्घकाळ टिकाऊपणा मिळतो. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या कुंपणाचे आयुष्यमान सुमारे ६० वर्षांपर्यंत राहू शकते. तसेच रुळांपासून सुमारे चार फूट उंचीचे असल्यामुळे हे कुंपण ओलांडणे कठीण असून जनावरे रुळांवर येण्यास प्रभावीपणे अडथळा निर्माण होतो. त्यावर उपाय शोधण्यात आला. हे कुंपण प्रतिमीटर ३४०० रुपये दराने उपलब्ध होत असल्याने ते बाउंडरी वॉल पेक्षा स्वस्त असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
गाड्या १६० किमी वेगाने धावणाररेल्वेच्या या उपाययोजनांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये घट होईल, तसेच जनावरांचे होणारे मृत्यूही टाळता येणार आहेत, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. उर्वरित काम लवकरच पूर्ण झाल्यानंतर गाड्यांचा वक्तशीरपणा सुधारण्यास आणि प्रवासी सुरक्षिततेत वाढ होण्यास हातभार लागणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. या उपाययोजनेमुळे भविष्यात या मार्गावर १६० किमी प्रतितास वेगाने गाड्या चालवण्याचे लक्ष्य गाठण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आमच्या मार्गांवर चालणाऱ्या ट्रेनचा वेग १६० किमी राखण्यासाठी रूळ सुरक्षित करण्याचे आमचे प्रयत्न असून हा प्रकल्प त्याचाच एक भाग आहे. रुळांलगत कुंपण उभारल्याने रेल्वे संचलनातले अडथळे कमी होणार असून जनावरे देखील सुरक्षित राहणार आहेत. - विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे
Web Summary : Western Railway erected steel fencing along 337 km of the Virar-Ahmedabad route to prevent animal intrusions and accidents. The project cost ₹119 crore and aims to improve safety and punctuality, enabling trains to run at 160 kmph.
Web Summary : पश्चिम रेलवे ने विरार-अहमदाबाद मार्ग पर जानवरों के घुसपैठ और दुर्घटनाओं को रोकने के लिए 337 किमी तक स्टील की बाड़ लगाई। इस परियोजना की लागत ₹119 करोड़ है और इसका उद्देश्य सुरक्षा और समयनिष्ठा में सुधार करना है, जिससे ट्रेनें 160 किमी प्रति घंटे की रफ्तार से चल सकें।