Join us  

'राजकारणातील पवारांविषयीची भीती संपली', कावळ्यांवरुन शिवसेनेनं निशाणा साधला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 8:35 AM

शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातून खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली.

ठळक मुद्देशिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातून खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली.पवार यांच्याबद्दल महाराष्ट्राला आदर आहे, पण राजकारणातील त्यांच्याविषयीची भीती संपली आहे, असे म्हणत शिवसेनेच्या सामनातील अग्रलेखातून पवारांचं राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न शिवसेनेनं केला आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी रविवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीला उपस्थित राहून महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी पक्षाला लागलेल्या गळतीवर बोलताना ते म्हणाले की, आज अनेक लोक पक्ष सोडत आहे. मात्र, आपण सर्वांनी, कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी असा सल्ला त्यांनी महिला कार्यकर्त्यांना दिला. पवार यांच्या या विधानाला शिवसेनेने अंगाशी घेत, पवारांवर त्याच भाषेत टीका केली आहे. तसेच, शरद पवार अचानक शिवसेनेची भाषा बोलू लागले आहेत, ही गमतीची गोष्ट असल्याचेही शिवसेनेनं म्हटलं आहे.  

शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातून खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली. कावळ्यांची नाही, तर मावळ्यांची चिंता करावी, असे म्हणत राष्ट्रवादी पक्षातून सेना-भाजपात जाणाऱ्या नेत्यांना पवारांनी टोला लगावला होता. पवारांच्या शब्दातील रोख ओळखून शिवसेनेने अग्रलेखातून पवारांवर टीकेचे बाण सोडले आहेत. शिवसेनेने संकटकाळी जी भाषा वापरली, तीच भाषा वापरुन पोखरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला ऊर्जा देण्याचं काम पवार करीत आहेत. पवार यांच्याबद्दल महाराष्ट्राला आदर आहे, पण राजकारणातील त्यांच्याविषयीची भीती संपली आहे, असे म्हणत शिवसेनेच्या सामनातील अग्रलेखातून पवारांचं राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न शिवसेनेनं केला आहे. तसेच, जे कावळे उडाले त्या कावळ्यांना इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून उडवणारे कोण होते ? पवारसाहेब तुम्हीच होता. शेवटी कावळेच ते, कावळेच राहिले. असे अनेक कावळे शिवसेनेतून उडून गेले. तेव्हा उडाले ते कावळे राहिले ते मावळे या मंत्रावर शिवसेना उभी राहिली. कारण, शिवसेनेत बाळासाहेबांनी घडवलेले मावळे हे जमिनीवरच राहिले, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखातून पवारांवर शरसंधान साधले. 

दरम्यान, मुंबई येथे रविवारी राष्ट्रवादी पक्षातील महिला कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणातून पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांचा समाचार घेतला. आज अनेक लोक पक्ष सोडत आहे. मात्र जे लोक खटल्यात आहेत त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत आहे. त्यामुळे पक्षगळती होत आहेत. आपण पूर्ण स्वच्छ आहात तर आपल्याला कसलीच चिंता नाही. यापुढे आपण आपण सर्वांनी, कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी असेही पवार म्हणाले होते. 

टॅग्स :शरद पवारउद्धव ठाकरेशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस