दरडी कोसळण्याचे भय कायम! मुंबईत २७९ ठिकाणे; ७५ धोकादायक, ४५ अतिधोकादायक श्रेणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 13:59 IST2025-06-06T13:58:17+5:302025-06-06T13:59:13+5:30

पालिकेच्या नोटिशीकडे रहिवाशांचे दुर्लक्ष

Fear of landslides persists 279 places recorded in Mumbai: 75 dangerous, 45 in extremely dangerous category | दरडी कोसळण्याचे भय कायम! मुंबईत २७९ ठिकाणे; ७५ धोकादायक, ४५ अतिधोकादायक श्रेणीत

दरडी कोसळण्याचे भय कायम! मुंबईत २७९ ठिकाणे; ७५ धोकादायक, ४५ अतिधोकादायक श्रेणीत

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत धोकादायक इमारतींसोबतच दरडींचा विषय ऐरणीवर येतो. विविध परिसरातील डोंगर उतारांवरील भागात अशी जवळपास २७९ दरडी कोसळण्याची ठिकाणे आढळून आली आहेत. विक्रोळी, घाटकोपर, मानखुर्द येथील डोंगर उतारांवरील शेकडो झोपड्या दरडी कोसळण्याच्या छायेखाली आहेत. दरम्यान, यातील ७५ ठिकाणे धोकादायक, तर ४५ ठिकाणे ही अतिधोकादायक श्रेणीत असल्याचे मागील वर्षी पालिकेने केलेल्या पाहणीतून उघड झाले होते.

घाटकोपर येथील असल्फा व्हिलेज, शिव येथील ॲण्टॉप हिल, चेंबूर-वाशीनाका, विक्रोळी पार्कसाईट, भांडुप, चुनाभट्टी-कुर्ल्यातील विस्तीर्ण कसाई वाडा, आदी ठिकाणच्या डोंगरानजीक हजारो झोपड्या आहेत. काही कच्च्या तर काही पक्क्या बांधकाम केलेल्या या झोपड्या एकमेकांना आधार देत अनेक वर्षांपासून वसल्या आहेत. 

पालिकेच्या नोटिशीकडे रहिवाशांचे दुर्लक्ष

पावसाळा जवळ आला की, येथे राहणे धोक्याचे आहे, तातडीने स्थलांतरित करावे, अशी नोटीस पालिकेचे अधिकारी झोपड्यांवर चिकटवून जातात. मात्र, रहिवासी पर्यायी जागा नसल्याने तेथेच जीव मुठीत घेऊन ते राहतात. मात्र, दुर्घटना घडल्यास जीवित अथवा वित्तहानी होते.

मॅस नेट बसवण्याचा बैठकीत निर्णय

पावसाळ्यापूर्वी दरडीच्या ठिकाणी भिंत, दोर बांधणे, मातीची धूप थांबविणे अशा उपाययोजना केल्या जातात. त्याचबरोबर दरडींच्या ठिकाणच्या संरक्षक भितींमधून पाण्याचा निचरा करणारी छिद्रे मातीमुळे किंवा कुणी बुजविली असल्यास, ती मोकळी केली जातात.

दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या भागांत मॅस नेट बसविण्याचा निर्णय मुंबई उपनगराच्या नियोजन समितीच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. नऊ मीटरपेक्षा कमी उंचीची भिंत असणाऱ्या ठिकाणी म्हाडा मॅस नेट बसविणार आहे, तर नऊ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या ठिकाणी मॅस नेट बसविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे.

मुंबईतील दरडींची काही ठिकाणे

  • पवई येथील इंदिरानगर, गौतम नगर, पासपोली, जयभीमनगर, गौतमनगर. भांडुप पश्चिमेतील रमाबाई आंबेडकर नगर भाग १ व २, नरदास नगर, गावदेवी टेकडी, गावदेवी मार्ग, टेंभीपाडा, रावते कम्पाउंड, खिंडीपाडा, रामनगर, अशोक टेकडी, आंब्याची भरणी, डकलाईन रोड, नवजीवन सोसायटी, तानाजी वाडी, दर्गा रोड.

  • चेंबूर येथे जय अंबेनगर, लक्की वे ब्रिजच्या बाजूला, इंडियन ऑइलनगर, पंचशीलनगर. कुर्ला येथील हिंदू स्मशानभूमी, कसाईवाडा, बंडू खरात चाळ, नागोबा चौक, स्वदेशी मिल रोड, स्वदेशी मिल कंपाऊंड, नानीबाईळ, वजीरबी चाळ, लाल टाकीजवळ, अब्दुल वहाब चाळ, खजुरी स्कूल.

  • विक्रोळी पार्कसाईट येथील राहुलनगर, हनुमाननगर, संजय गांधीनगर, तर घाटकोपर येथील भीमनगर, रामनगर, असल्फा, मोहिली, विक्रोळी पश्चिम परिसरातील सूर्यानगर.

Web Title: Fear of landslides persists 279 places recorded in Mumbai: 75 dangerous, 45 in extremely dangerous category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.