प्रसादातील भेसळीवर ‘एफडीए’चा ‘त्रिनेत्र’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 11:42 IST2025-08-25T11:42:13+5:302025-08-25T11:42:30+5:30
Ganesh Mahotsav News: गणेशोत्सवात मिठाई, मोदक, लाडू अशा विविध प्रसादाच्या विक्रीत प्रचंड वाढ होते. याच काळात पदार्थांत भेसळ करण्याचे प्रकार वाढतात. त्यांना आळा घालण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कंबर कसली आहे. यंदा असे प्रकार घडू नयेत, प्रसादाच्या पदार्थांत भेसळ होऊ नये यासाठी त्रिस्तरीय उपाययोजना आखण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी याबाबत ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत भेसळखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

प्रसादातील भेसळीवर ‘एफडीए’चा ‘त्रिनेत्र’
- राजेश नार्वेकर
(आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र)
गणेशोत्सवात मिठाई, मोदक, लाडू अशा विविध प्रसादाच्या विक्रीत प्रचंड वाढ होते. याच काळात पदार्थांत भेसळ करण्याचे प्रकार वाढतात. त्यांना आळा घालण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कंबर कसली आहे. यंदा असे प्रकार घडू नयेत, प्रसादाच्या पदार्थांत भेसळ होऊ नये यासाठी त्रिस्तरीय उपाययोजना आखण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी याबाबत ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत भेसळखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
सणासुदीत मिठाईत केली जाणारी भेसळ कशी रोखणार?
उत्तर : दरवर्षी ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत फेस्टिव्हल ड्राइव्ह ही विशेष मोहीम राबविली जाते. भेसळ आढळल्यास कारवाई केली जाते. बाजारपेठेतून खवा, मिठाई, दुधाचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. छापे, तपासणी आणि नमुन्यांची चाचणी हे नियमित सुरू असते. यंदा आम्ही केवळ तपासणीवर थांबलेलो नाही, तर त्रिस्तरीय उपाययोजना आखली आहे. एफडीए, उत्पादक-विक्रेते आणि ग्राहक या तीनही घटकांना यामध्ये सामावून घेतले आहे. पदार्थ तयार होतानाच त्यात भेसळ होऊ नये, यासाठी स्थानिक स्तरावर उत्पादकांशी संवाद साधत आहोत. प्रसादात भेसळ केल्यास कठोर कारवाई केली जाईल. अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करा, उत्पादनाबाबत माहिती घ्या, त्याची एक्स्पायरी डेट तपासा आदी बाबींतून ग्राहकांचे प्रबोधनही केले जात आहे.
बनावट खवा, मिठाई आढळल्यास काय कारवाई केली जाते? तक्रार कशी नोंदवावी?
उत्तर : खाद्यपदार्थांच्या नमुन्यांमध्ये भेसळ आढळल्यास संबंधित विक्रेत्यावर कारवाई केली जाते. परवाना रद्द करणे, दंड, तसेच गुन्हा दाखल केला जातो. नागरिकांना अशा प्रकारच्या तक्रारीसाठी १८००२२२३६५ या हेल्पलाइनवर संपर्क साधता येईल. नियंत्रण कक्ष २४ तास सुरू असतो. तिथे ऑनलाइन तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यावर नियंत्रण कक्षातून संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार वर्ग केली जाते व कारवाई केली जाते.
नमुने तपासणीचा निकाल त्वरित मिळावा, यासाठी कोणती सुविधा उपलब्ध आहे?
उत्तर : आमच्या प्रयोगशाळांमध्ये आधुनिक उपकरणे आहेत. डिजिटल सिस्टिममुळे नमुने ट्रॅक करता येतात आणि चाचणी अहवाल ऑनलाइन मिळतो. आमच्याकडे २ फूड सेफ्टी ऑन व्हील्स वाहने आहेत. त्याद्वारे तातडीने तपासणी शक्य होते. लवकरच आणखी २३ फूड सेफ्टी ऑन व्हील्स वाहने घेणार आहोत.
गणेशोत्सवात रस्त्यावरील फूड स्टॉल्स, मंडपांतील प्रसाद वितरणावर कसे लक्ष ठेवले जाते?
उत्तर : सर्व विक्रेत्यांनी नोंदणी केलेली असावी किंवा परवाना घेतलेला असावा. स्वच्छ पाणी, हातमोजे, झाकलेले व सुरक्षित अन्नपदार्थ ठेवणे गरजेचे आहे. प्रसाद तयार करताना स्वच्छतेचे नियम पाळणे आवश्यक आहे. अन्नपदार्थ जास्त काळ उघडे ठेवू नयेत. मोदक व प्रसाद तयार करणाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. १२ लाखांपर्यंत उलाढाल असलेल्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे.
(शब्दांकन - खलील गिरकर,
वरिष्ठ उपसंपादक)