३ हजार ४८५ हॉटेल्स, कॅन्टीनच्या अन्नाची एफडीएकडून तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 12:35 IST2025-10-19T12:35:11+5:302025-10-19T12:35:11+5:30
या अभियानांतर्गत हॉटेल्स, कॅन्टीन्स अशा तब्बल ३ हजार ४८५ विविध अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली.

३ हजार ४८५ हॉटेल्स, कॅन्टीनच्या अन्नाची एफडीएकडून तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अन्न व औषध प्रशासनातर्फे राज्यात ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ हे विशेष तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत हॉटेल्स, कॅन्टीन्स अशा तब्बल ३ हजार ४८५ विविध अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
तपासणीमध्ये दूध, खवा/मावा, खाद्यतेल, तूप, मिठाई, ड्रायफ्रूट्स, चॉकलेट्स, भगर व अन्य अन्नपदार्थांचे ४ हजार ६७६ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. या तपासणीत अनियमितता आढळलेल्या १,४३१ आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली असून ४८ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर एका आस्थापनेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
सुरक्षित, दर्जेदार अन्न उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री योगेश कदम, सचिव धीरज कुमार व आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागामार्फत, राज्यात सणासुदीच्या कालावधीत अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी ११ ऑगस्ट ते २५ ऑक्टोबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे.
भेसळीबाबत संशय आल्यास जवळच्या अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.