अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 19:57 IST2025-06-01T19:57:14+5:302025-06-01T19:57:37+5:30
FDA Action on Zepto: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
FDA Action on Zepto: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी झेप्टोची मूळ कंपनी किराणाकार्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचा मुंबई, धारावीतील परवाना निलंबित केला आहे. महाराष्ट्र FDA ने धारावी येथील झेप्टोच्या गोदामावर अचानक छापा टाकला, यावेळी मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली. त्यामुळे हीच कारवाई करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम आणि सहआयुक्त (अन्न) मंगेश माने यांच्या निर्देशानुसार अन्न सुरक्षा अधिकारी राम बोडके यांनी ही कारवाई केली आहे. छापेमारीदरम्यान अधिकाऱ्यांना खालील बाबी आढळल्या...
काही अन्नपदार्थांवर बुरशीची वाढ.
अन्नपदार्थ साचलेल्या आणि तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवलेले होते.
कोल्ड स्टोरेजचे तापमान नियमांनुसार राखले गेले नव्हते.
अस्वच्छ परिसर, अन्न पदार्थ थेट जमिनीवर ठेवले होते.
मुदत संपलेले अन्नपदार्थ वेगळे केलेले नव्हते.
मीडियाला दिलेल्या माहितीत एफडीएने म्हटले की, आम्ही काही काळापासून या गोदामांची तपासणी करण्याची योजना आखत होतो. यादरम्यान आम्हाला अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांच्या कार्यालयासह स्थानिक मनसे कार्यकर्त्यांकडून काही सूचना प्राप्त झाल्या. या सूचनांच्या आधारावर आम्ही तपासणी केली असता अतिशय वाईट परिस्थिती आढळली. त्यामुळेच आम्ही तात्काळ परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. अन्न सुरक्षा नियमांचे पूर्णपणे पालन होईपर्यंत आणि परवाना प्राधिकरणाकडून मंजुरी मिळेपर्यंत परवाना निलंबित राहील.
झेप्टोकडून कोणताही प्रतिक्रिया नाही
या कारवाईवर कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु अशा कारवाईमुळे कंपनीच्या ब्रँड प्रतिमेवर आणि ग्राहकांच्या विश्वासावर परिणाम होऊ शकतो.